कोल्हापूर – खासदार राजू शेट्टी यांना ब्राह्मण समाजविषयी केलेले वादग्रस्त विधान महागात पडणार असे दिसत आहे, कारण ब्राम्हण समाजाविषयी केलेल्या विधानाबाबत २४ तासांत खुलासा करावा, अशी नोटीस खासदार राजू शेट्टी यांना हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी नंदकुमार काटकर यांनी बजावली होती. त्यानंतर देखील राजू शेट्टी यांनी उत्तर न दिल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुलकर्णी, देशपांडे , जोशी आडनावाच्या व्यक्ती सैन्यात कधीच भरती होत नाहीत, शेतकऱ्यांचीच मुलेच सैन्यात असतात , असं विधान राजू शेट्टी यांनी केल होतं. त्यानंतर विविध संघटनांनी शेट्टी यांच्याविरोधात तक्रारी दाखल केल्या होत्या.
खासदार राजू शेट्टी यांनी २४ तासात उत्तर न दिल्यामुळे, अखेर आचारसंहिता भंग केल्या प्रकरणी, तसेच लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ च्या कलम १२५ अन्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश, निवडणूक निर्णय अधिकारी नंदकुमार काटकर यांनी दिले. यानुसार राजू शेट्टी यांच्यावर हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, ब्राम्हण समाजाबद्दल केलेल्या वक्तव्याची खासदार राजू शेट्टी यांनी दिलगिरी व्यक्त केली होती. मी केलेल्या वक्तव्याचे कुणीही वाईट वाटून घेऊ नये. सीमेवर लढणाऱ्या जवानांच्याबद्दल बोलत असताना अनावधानाने माझ्याकडून काही शब्द गेले पण माझा बोलण्याचा मूळ मुद्दा बाजूलाच ठेऊन त्या वक्तव्याचा जास्त गाजावाजा झाला. पण माझा त्यांच्याबद्दल बोलण्याचा काहीच हेतू नव्हता, असं राजू शेट्टी दिलगिरी व्यक्त करताना म्हटले होते.