कोल्हापूर – दुधाचे दर पडल्यामुळे राज्यातील शेतकरी अक्षरशः मेटाकुटीस आला आहे. दुधाला प्रतिलिटर 5 रुपयांचे तातडीचे अनुदान द्यावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने 21 जुलै रोजी एक दिवसाचे राज्यव्यापी लाक्षणिक दूध बंद आंदोलन पुकारले आहे. तसेच केंद्र व राज्य सरकारने दूध दरामध्ये तातडीने हस्तक्षेप करावा. अन्यथा, लॉकडाऊन मोडून बेमुदत दूध बंद आंदोलन करू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला.
राज्यातील शेतकऱ्यांशी फेसबुकच्या माध्यमातून राजू शेट्टी यांनी संवाद साधला. यावेळी शेट्टी म्हणाले, करोना विषाणूच्या प्रादुर्भावाने राज्यातील दूध व्यवसायावर संक्रात आलेली आहे. लॉकडाऊनमुळे हॉटेल, आईस्क्रीम, मॉल, विवाह सोहळे बंद झाले आहेत.
याचा विपरीत परिणाम दुधाच्या विक्रीवर झालेला आहे. तसेच दूध पावडरचा दर 330 रुपयांवरून 180 रुपयांवर घसरला आहे. त्यातच केंद्र सरकारने 10 हजार टन दूध पावडर आयात करण्याचा निर्णय घेऊन दूध उत्पादकांना देशोधडीस लावण्याचे पाप करत आहेत.
राज्य सरकारने प्रतिलिटर दुधास 5 रुपयांचे अनुदान द्यावे. तसेच केंद्र सरकारने 30 हजार टन दूध पावडर बफर स्टॉक करावा. दूध पावडरकरिता प्रतिकिलो 50 रुपये अनुदान आणि दूध पावडर, बटर व तूप यावरील जीएसटी कमी करण्यात यावे. या मागणीकरिता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे 21 जुलै रोजी एक दिवसाचे दूध बंद आंदोलन करण्यात येणार आहे.