Rajpal Yadav: चेक बाउन्स प्रकरणामुळे अडचणीत सापडलेले बॉलिवूड अभिनेते राजपाल यादव यांना नुकताच अंतरिम जामीन मिळाला आहे. जामिनानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या भविष्यातील कामाबद्दल मोठा खुलासा केला. पुढील सात वर्षांत आपल्या हाती तब्बल १२०० कोटी रुपयांचे ब्रँडिंग प्रोजेक्ट्स असल्याचा दावा त्यांनी केला आहे. ९ कोटी रुपयांच्या चेक बाउन्स प्रकरणात त्यांना आत्मसमर्पण करावे लागले होते. या काळात बॉलिवूडमधील काही कलाकारांनी त्यांना मदतीचा हात दिला. त्यामध्ये सोनू सूद, सलमान खान आणि अजय देवगण यांची नावे विशेष उल्लेखनीय आहेत. या सर्वांचे त्यांनी मनापासून आभार मानले. पत्रकार परिषदेत राजपाल यादव म्हणाले की, “पुढील सात वर्षांत माझ्याकडे १२०० कोटींचे ब्रँडिंग प्रोजेक्ट्स आहेत. मी चार मोठे करार केले आहेत. यामध्ये चित्रपटांचा समावेश नाही. काही प्रोजेक्ट्स २०० कोटींचे आहेत, तर काहींची किंमत २००० कोटींपर्यंत जाते. या प्रकल्पांमधून मला मानधन आणि भागीदारी या दोन्ही स्वरूपात उत्पन्न मिळणार आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, त्यांच्या हाती सध्या दहा चित्रपटांच्या ऑफर्स आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात ते मोठ्या प्रमाणावर पडद्यावर दिसणार आहेत. अडचणींचा काळ आता संपत असल्याचेही त्यांनी सूचित केले. Rajpal Yadav तुरुंगवासाच्या काळात अनेकांनी आर्थिक मदत केल्याचे सांगत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. “गेल्या २० दिवसांत मला लहान मुलांपासून मोठ्या लोकांपर्यंत अनेकांनी मदत केली. काहींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक कोटींपेक्षा जास्त मदत केली आहे. मी सर्वांचे आभार मानण्यासाठी एक अधिकृत निवेदन जारी करणार आहे,” असे ते म्हणाले. याचबरोबर त्यांनी एक महत्त्वाची विनंतीही केली. “ज्यांनी मला मदत केली आहे त्यांनी आपले बँकेचे तपशील पाठवावेत. मला थोडा वेळ द्या, मी सर्वांचे पैसे सन्मानपूर्वक परत करेन,” असे आश्वासन त्यांनी दिले. दरम्यान, राजपाल यादव लवकरच मोठ्या चित्रपटांत झळकणार आहेत. ते ‘भूत बंगला’ या चित्रपटात दिसणार असून त्यामध्ये अक्षय कुमार, तब्बू, परेश रावल आणि वामिका गब्बी प्रमुख भूमिकेत आहेत. तसेच ‘वेलकम टू द जंगल’ हा त्यांचा चित्रपट जून २०२६ मध्ये प्रदर्शित होणार आहे. एकीकडे आर्थिक वाद आणि न्यायालयीन प्रकरण, तर दुसरीकडे भविष्यातील कोट्यवधींचे प्रोजेक्ट्स – अशा दोन टोकांच्या परिस्थितीत राजपाल यादव सध्या चर्चेत आहेत. पुढील काळात त्यांचे हे दावे कितपत खरे ठरतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.