Rajnath Singh : राजनाथ सिंह यांनी घेतली पुतीन यांची भेट

मॉस्को : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली आणि द्विपक्षीय संरक्षण सहकार्याबाबतच्या विविध मुद्द्यांवर चर्चा केली. लष्कर व लष्करी सहकार्याबाबतच्या भारत रशिया आंतर सरकार आयोगाच्या २१ व्या बैठकीदरम्यान संरक्षण मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातर्फे अध्यक्ष पुतीन यांना शुभेच्छा दिल्या.
राजनाथ सिंह यांनी यावेळी द्विपक्षीय लष्करी सहकार्याच्या विविध पैलूंवर चर्चा केली. दोन्ही देशांमधील या भागीदारीमध्ये भरपूर क्षमता असून दोघांच्या एकत्रित प्रयत्नांमधून उल्लेखनीय यशाचा मार्ग प्रशस्त होईल अशी भावना दोन्ही नेत्यांनी व्यक्त केली.
आमच्या देशांमधील मैत्री सर्वात उंच पर्वत शिखरापेक्षाही उंच व सर्वात जास्त खोली असलेल्या समुद्रापेक्षाही जास्त खोल आहे, असे राजनाथ सिंह या बैठकीदरम्यान म्हणाले, भारत नेहमीच रशियाच्या सोबत होता आणि भविष्यातही असेल, असेही ते याप्रसंगी बोलताना म्हणाले.
भारत नेहमीच रशियाचा सहकारी…
संरक्षण मंत्र्यांनी देशांच्या संरक्षण पैलूंना एकत्रित आणि सखोल करण्यासाठी आणखी सहकार्याचे आवाहन केले आणि भू-राजकीय आव्हाने आणि मोठा दबाव असूनही दोन्ही राष्ट्रांमधील परस्परसंवाद अधिक दृढ करण्यावर भर दिला. भू-राजकीय आव्हाने आणि सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही बाजूने भारतावर मोठा दबाव असूनही, भारताने रशियाशी केवळ जवळचा संपर्क चालू ठेवला असून आम्ही नेहमीच आमच्या रशियासोबत असू असा जाणीवपूर्वक निर्णय घेतला असल्याचे असेही राजनाथ सिंग म्हणाले.





