हा तर शिवप्रेमींना अवमान : इंद्रजित सावंत
कोल्हापूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नव्या झेंड्यावर वापरलेली शिवमुद्रा ही बोगस आणि नकली आहे. हे अपमानजक आणि शिवप्रेमींच्या भावना दुखावणारे आहे. आपल्या राजकीय फायद्यासाठी ऐतिहासिक राजमुद्रा वापरणे अतिशय चुकीचे आहे. ती तत्काळ मागे घ्यावी, असा इशारा प्रख्यात इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी दिला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नव्या झेंड्याबद्दल शिवप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यापार्श्वभूमीवर इतिहास संशोधक इंद्रजित सावंत म्हणाले की, स्वराज्य संकल्पक शहाजीराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना वयाच्या 12 व्या वर्षी राजमुद्रा दिली होती.
ही राजमुद्रा विश्वाला वंदनीय आहे. ही राजमुद्रा अनुष्ठुप छंदामध्ये साकारण्यात आली होती. कॅलिग्राफी करताना विशेष काळजीही घेतली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदेश पत्रावरच ही राजमुद्रा उमटवली जायची. तिचा इतरत्र वापर झाला नव्हता. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या झेंड्यावर वापरण्यात आलेल्या राजमुद्रा ही राजमुद्रेची नक्कल आहे.
राज ठाकरे यांचे गुरू बाबासाहेब पुरंदरे हे इतिहासाचे जाणकार असल्याचे सांगतात. पण त्यांनी मनसेच्या झेंड्यावर वापरली जाणारी राजमुद्रा, तिची कॅलिग्राफी याबद्दलही काळजी घेतली नसल्याचे दिसते असे सावंत म्हणाले.
देशातील कोणत्याही राजमुद्रेला एवढा सन्मान मिळाला नाही तेवढा सन्मान छत्रपती शिवरायांच्या राजमुद्रेला मिळाला.
शिवरायांच्या आज्ञापत्रावर या राजमुद्रेचे स्थान होते. काही लोक वैयक्तिक प्रेमाने आणि आदरातून आपल्या वाहनांवर, घरामध्ये राजमुद्रेचे स्टिकर लावतात. त्यांनी काळजी घेणं गरजेच आहे. उद्या गमज्यांवर राजमुद्रा प्रकाशित करुन ते कुणाच्याही गळ्यात घातले जातील. गळ्यात घातल्यानंतर तुमचे कार्यकर्ते ते कुठेही ठेवतील.
त्यातून राजमुद्रेची आणि लोकांच्या भावनेची विटंबना होणार आहे.
शिवसेनेची स्थापना शिवरायांचे नाव समोर ठेऊन झाल्याचा काही लोक संदर्भ देत आहे. त्यावर मत मतांतरे आहेत. पण शिवसेनेने शिवरायांची कोणतीही प्रतिके वापरली नाहीत. झेंड्यावर राजमुद्रा वापरणे हा राजकारणाचा भाग होतो आहे. झेंड्यावरुन राजमुद्रा तत्काळ हटविण्यात यावी, अशी मागणीही सावंत यांनी केली.