Rajkummar Rao surrendered | बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता राजकुमार राव (Rajkummar Rao) सध्या एका जुन्या प्रकरणामुळे चर्चेत आला आहे. या प्रकरणात त्याने आज स्वतःला जालंधर कोर्टात सरेंडर केलं आहे. तो मंगळवारी दुपारी 4 वाजता जालंधर न्यायालयात पोहोचला. त्याने स्वत: हजर राहत सरेडर केलं. त्यानंतर न्यायाधीश श्रीजन शुक्ला यांनी त्याचा जामीन मंजूर केला. याअगोदर राजकुमार रावला (Rajkummar Rao) अटकपूर्व जामीन मिळालेला होता मात्र तो मागील सुनावणीस हजर नव्हता. त्यामुळे कोर्टाने त्याच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं होतं. परिणामी, त्याने वैयक्तिकरित्या कोर्टात हजर राहून पुढील कारवाईपासून स्वतःचा बचाव केला. या प्रकरणाबद्दल थोडक्यात जाणून घेऊया.. काय आहे नेमकं प्रकरण? ‘बहन होगी तेरी’ या चित्रपटात एक दृश्य आहे, ज्यामध्ये राजकुमार रावने भगवान शिव यांची भूमिका साकारली होती. त्या दृश्यात त्यांना चप्पल घातलेले दाखवण्यात आले. हे दृश्य काही प्रेक्षकांना अत्यंत आक्षेपार्ह वाटले. त्यातून धार्मिक भावना दुखावल्याचा मुद्दा उचलून धरण्यात आला. चित्रपटाच्या एका पोस्टरमध्येही वादग्रस्त मजकूर होता. यावरून राजकुमार राव, अभिनेत्री श्रुती हासन, दिग्दर्शक अजय के पन्नालाल आणि निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. जालंधर कोर्टात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. ‘बहन होगी तेरी’ या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर हा चित्रपट मोठ्या आशेने बनवण्यात आला होता. 13 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये हा चित्रपट बनवण्यात आला होता. मात्र हा चित्रपट पूर्णपणे फ्लॉप ठरला. या चित्रपटाने फक्त 2.69 कोटींची कमाई केली होती. या चित्रपटाच्या निमित्ताने राजकुमार राव (Rajkummar Rao) आणि श्रुती हासन पहिल्यांदाच एकत्र आले होते मात्र त्यांच्या जोडीला प्रेक्षकांकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही.