नवी दिल्ली : माजी आयएएस अधिकारी राजकुमार गोयल नवे मुख्य माहिती आयुक्त म्हणून सुत्रे हाती घेतील. त्यांना सोमवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यीय समितीने गोयल यांच्या नावाची शिफारस केली. तसेच, इतर ८ माहिती आयुक्तही निश्चित केले. गोयल हे भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) १९९० च्या तुकडीचे अधिकारी आहेत. ते न्याय विभागाचे सचिव म्हणून ३१ ऑगस्टला सेवानिवृत्त झाले. त्याआधी त्यांनी केंद्रीय गृह मंत्रालयात सचिव (सीमा व्यवस्थापन) म्हणून कार्य केले. इतर माहिती आयुक्तांमध्ये माजी आयएएस, माजी आयपीएस अधिकाऱ्यांसह काही पत्रकारांचाही समावेश आहे. नव्या नियुक्त्यांमुळे केंद्रीय माहिती आयोगातील संख्याबळ ९ वर्षांच्या खंडानंतर पूर्ण होईल. मुख्य माहिती आयुक्तांच्या नेतृत्वाखालील आयोगात कमाल १० आयुक्त नियुक्त केले जाऊ शकतात. नव्या नियुक्त्यांआधी आयोगात २ आयुक्तच कार्यरत होते. नव्या नियुक्त्यांसाठी नुकतीच मोदींच्या नेतृत्वाखालील समितीची बैठक झाली. त्या समितीच्या इतर २ सदस्यांमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा समावेश आहे. संबंधित बैठकीत राहुल यांनी असहमतीची भूमिका घेतल्याचे समजते. त्यांनी निवडीसाठी स्वीकारण्यात आलेल्या निकषांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याची माहिती कॉंग्रेसमधील सुत्रांकडून देण्यात आली.