नवी दिल्ली: राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधीनंतर आता सदस्यांची विविध समित्यांवर नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या चीनसोबतचा तणाव वाढला असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी संरक्षण मंत्री शरद पवार यांना संरक्षण विभाग संबंधित संसदीय स्थायी समितीवर नियुक्त करण्यात आले आहे.
तसेच राहुल गांधी यांचे विश्वासू मानले जाणारे कॉंग्रेस खासदार राजीव सातव यांनाही या समितीत स्थान देण्यात आले आहे.
या नियुक्त्या राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी केल्या आहेत. भाजप खासदार उदयनराजे भोसले यांना रेल्वे, शरद पवार आणि राजीव सातव यांना संरक्षण तर प्रियांका चतुर्वेदी यांना वाणिज्य विभाग संबंधित संसदीय स्थायी समितीवर नियुक्त करण्यात आले आहे.
भाजप खासदार भागवत कराड यांची पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू विभागाशी संबंधित संसदीय स्थायी समितीवर वर्णी लागली. रामदास आठवले यांच्याकडे केंद्रीय सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्रीपद असल्याने त्यांना कोणत्याही समितीमध्ये पाठवण्यात आलेले नाही.
याशिवाय ज्योतिरादित्य शिंदे यांना मानव संसाधन विकास, दिग्विजय सिंह यांना नगर विकास, मल्लिकार्जुन खर्गे यांना वाणिज्य, एचडी देवेगौडा यांना रेल्वे विभागाशी संबंधित संसदीय स्थायी समितीवर नियुक्त करण्यात आले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, कॉंग्रेस नेते राजीव सातव, भाजप नेते उदयनराजे भोसले, शिवसेना नेत्या प्रियांका चतुर्वेदी आणि भाजपच्या भागवत कराड अशा महाराष्ट्रातील सहा खासदारांनी शपथ घेतली. माजी मंत्री आणि राष्ट्रवादीच्या नेत्या फौजिया खान यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे त्या उपस्थित नव्हत्या.