राजगुरूनगर (प्रतिनिधी) : राजगुरूनगर शहरात लॉकडाऊनच्या काळात नागरिकांवर पोलिसांची आता ड्रोन कॅमेराद्वारे नजर असणार आहे. राजगुरूनगर शहर आजपासून तीन दिवस पूर्णतः बंद आहे. नगरपरिषदेने केलेल्या 100 टक्के बंदला पहिल्याच दिवशी नागरिक, व्यापाऱ्यांचा 100 टक्के पाठिंबा मिळाला आहे.
देशात लॉकडाऊन आहे. त्याच पार्श्वभूमीवर खेड तालुक्यातील सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत. राजगुरूनगर शहरात पोलिसांच्या माध्यमातून शहरात येणाऱ्या नागरिकांना रोखण्यात येत आहे. शहरातील नागरिकही रस्त्यावर येत नसल्याने रस्ते सामसूम झाले आहेत. शहरात काही सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून नागरिकांना आवश्यक सेवा सुविधा घरपोच देण्यात येत आहेत मेडिकल व खाजगी दवाखाने मात्र सुरू आहेत.
अनावश्यक फिरणाऱ्यावर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे.त्यांच्या गाड्या जप्त केल्या जात आहेत. खेड पोलीस ठाण्यात पोलीस बळ अपुरे असल्याने त्या अंतर्गत येणाऱ्या सुमारे 100 गावांमध्ये कायदा सुव्यवस्था ठेवणे कठीण जात आहे. अशातच लॉकडाऊन झाल्याने पोलीस यंत्रणेवर ताण आला आहे. खेड पोलिसांच्या माध्यमातून लॉक डाऊनच्या काळात राजगुरूनगर शहरात लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनची मदत घेतली आहे.
ड्रोन च्या साहाय्याने शहरातील रस्ते, मोठ्या सोसायट्यावर पोलिसांचे लक्ष आहे. नागरिकानी बाहेर पडू नये घरातच थांबावे असे पोलिसांकडून आवाहन करण्यात येत आहे. जीवणावश्यक वस्तू घरपोच देण्यात येणार असून नागरिकानी पोलीस व सामाजिक संस्थांच्या नियुक्त केलेल्या व्यक्तींना तसेच किराणा दुकानदारांना संपर्क करावा असे आवाहन केले आहे.