प्रभात वृत्तसेवा राजगुरूनगर – राजकारणात निवडणूक जिंकण्यापेक्षा समाजासाठी दीर्घकालीन दृष्टीकोन महत्त्वाचा असतो. शिक्षणाला केंद्रस्थानी ठेवून जिल्हा परिषद निवडणुकीतील इच्छुक उमेदवार दीप्तीताई प्रसाद भोगाडे यांनी आयोजित केलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा आहे. भविष्यात निवडून आल्यास त्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी नक्कीच कटिबद्ध राहतील, असा विश्वास खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी व्यक्त केला. रेटवडी-वाफगाव जिल्हा परिषद गटाच्या इच्छुक उमेदवार दीप्तीताई प्रसाद भोगाडे यांच्या माध्यमातून राजगुरूनगर येथे प्रसिद्ध व्याख्याते प्रा. वसंत हंकारे यांचे प्रेरणादायी व्याख्यान तसेच गटातील प्रत्येक गावातील एका विद्यार्थ्यांसाठी हेलिकॉप्टर सफर आणि प्रत्येक गावातील तीन विद्यार्थ्यांना सायकल अशा अनोख्या लकी ड्रॉ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आमदार बाबाजी काळे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या कार्यक्रमास प्रा. वसंत हंकारे, खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयसिंग भोगाडे, माऊली ढेरंगे, दिलीप डुबे, मारुती सातकर, प्रसाद भोगाडे यांच्यासह विविध गावांतील पालक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.दीप्तीताई प्रसाद भोगाडे म्हणाल्या, जिल्हा परिषद शाळांची सद्यस्थिती सुधारण्याची नितांत गरज आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले जातील. अनेक विद्यार्थ्यांना आजही शाळेसाठी पायी प्रवास करावा लागतो; त्यासाठी वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्यास शाळांमध्ये मुलींसाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यावर माझा भर राहील. सक्षम आणि संवेदनशील प्रतिनिधी निवडून आल्यासच परिसराचा खर्या अर्थाने विकास होतो. त्या दृष्टीने मी ही निवडणूक लढवत आहे. प्रसिद्ध व्याख्याते प्रा. वसंत हंकारे यांनी विद्यार्थ्यांना अभ्यास, जिद्द, सातत्य आणि ध्येय निश्चिती यावर प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते लकी ड्रॉ काढण्यात आला. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले, तर हेलिकॉप्टर सफरीच्या घोषणेमुळे विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदेश टोपे व सुदाम कराळे यांनी केले, तर आभारप्रदर्शन जयसिंग भोगाडे यांनी मानले.