प्रभात वृत्तसेवा राजगुरुनगर – राजगुरुनगर नगरपरिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळत असून नगरपरिषदेत भाजपची सत्ता येणार असल्याचा विश्वास माजी सरपंच प्रदीप कासवा यांनी व्यक्त केला.नगराध्यक्ष पदाचे भाजपचे उमेदवार शिवाजी मांदळे तसेच नगरसेवक पदाचे सर्वच उमेदवार प्रचारात आघाडीवर असून आज शहरात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत भाजप नेते बाळासाहेब सांडभोर, दत्ता सांडभोर, माजी सरपंच प्रदीप कासवा, स्वानंद खेडकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. रॅलीची सुरुवात खेड कृषी उत्पन्न बाजार समितीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून झाली. त्यानंतर वाडा रस्ता – बाजारपेठ – नगर परिषद कार्यालय मार्गाने रॅली पुढे सरकली आणि भारत माता व्यासपीठ येथे समारोप झाला. रॅलीमध्ये भाजपचे नगरसेवक पदाचे उमेदवार कुमार सांडभोर, सुवर्णा सांडभोर, राजेंद्र जाधव, सुनंदा टाकळकर, शिवाजी मांदळे, शिल्पा घोलप, मेघा घुमटकर, तेजस घुमटकर, निलेश घुमटकर, अश्विनी कुंभार, फैज मोमीन, कविता वाळुंज-गायकवाड यांनी सहभाग नोंदवला. उमेदवारांनी शहरातील नागरिकांना मोठ्या उत्साहात भेट देत मतदानाचे आवाहन केले. रॅलीदरम्यान नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत उमेदवारांचे स्वागत केले.