प्रभात वृत्तसेवा राजगुरुनगर – राजगुरुनगर नगर परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या सातव्या दिवशी अध्यक्षपदासाठी एक उमेदवार उमेदवाराने एक अर्ज तर नगरसेवक पदासाठी ४९ उमेदवारांनी ६२ उमेदवारी अर्ज दाखल केले. आतापर्यंत नगराध्यक्ष पदासाठी ३ उमेदवारांनी ४ अर्ज तर नगरसेवक पदासाठी ९२ उमेदवारांनी ११६ अर्ज दाखल केले आहेत. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ शैलजा पाटील, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अंबादास गर्कळ यांनी दिली.उमेदवारी अर्ज भरण्यासाठी (दि.१६) उमेदवारी अर्ज भरताना शिवसेनेच्या राजश्री दत्तात्रय सांडभोर आणि अपक्ष उमेदवार राहुल विजय डोळस यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज भरले. सोमवार (दि.१७) हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. सुमारे तीनशेंपेक्षा जास्त इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन उमेदवारी अर्ज दाखल केल्याने (दि.१७) शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी होणार आहे. प्रशासनावर मोठा ताण येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.(दि.१६) रोजी नगराध्यक्षपदासाठी मंगेश वसंत गुंडाळ यांनी पुन्हा आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्जाची संख्या ४ झाली आहे.