पुणे जिल्हा | सर्वोत्कृष्ट बँक पुरस्काराने राजगुरूनगर बँकेचा गौरव

राजगुरुनगर, (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असलेल्या राजगुरूनगर सहकारी बँकेस महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स फेडरेशनने यावर्षीचा सहकार क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते शनिवारी (दि. 28 सप्टेंबर) स्वीकारला आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष दिनेश ओसवाल यांनी दिली.
फेडरेशन राज्यभरातील उत्कृष्ट कामकाज असलेल्या बँकांमधून दरवर्षी पुरस्कारार्थी बँका निवडते. राजगुरूनगर बँकेला 1000 ते 2500 कोटींच्या दरम्यान ठेवी असलेल्या गटातून तिसर्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे.
या पुरस्काराचे वितरण शनिवारी पुणे येथे कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेच्या सभागृहात झालेल्या बँक फेडरेशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात आले.
यावेळी रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे, फेडरेशनचे अध्यक्ष अजय ब्रह्मेचा, उपाध्यक्षा वैशाली आवाडे उपस्थित होते. राजगुरूनगर बँकेचे अध्यक्ष दिनेश ओसवाल, उपाध्यक्ष अविनाश कहाणे यांनी हा पुरस्कार स्वीकारला यावेळी संचालक किरण आहेर,
राजेंद्र सांडभोर, विजया शिंदे, राजेंद्र वाळुंज, अरूण थिगळे, विनायक घुमटकर, समीर आहेर, सचिन मांजरे, अश्विनी पाचारणे, रामदास धनवटे, तज्ञ संचालक अॅड. धर्मेंद्र खांडरे, गौतम कोतवाल, दीपक वारुळे, प्रकाश डोळस, मुख्य कार्यकारी अधिकारी शांताराम वाकचौरे उपस्थित होते.
बँकेला तब्बल 11 वर्षांच्या कालखंडानंतर फेडरेशनचा पुरस्कार मिळाला आहे. नोटाबंदी आणि करोनाच्या निराशाजनक कालावधीनंतर व्यावसायिक दृष्टिकोन, प्रेरणादायी वातावरण आणि सकारात्मक भूमिका यांमुळे बँकेने पुन्हा नवी भरारी घेतली आहे.
बँकेच्या या यशामध्ये संचालक मंडळ, व्यवस्थापन मंडळ, सर्व सभासद, ठेवीदार, खातेदार, ग्राहक, कर्जदार, अधिकारी, सेवकवृंद व हितचिंतकांचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष योगदान आहे, असे बँकेचे अध्यक्ष दिनेश ओसवाल यांनी सांगितले.
45 कोटी हा आजवरचा उच्चांकी ढोबळ नफा
रिझर्व्ह बँकेने फिनान्शियली साउंड अँड वेल मॅनेज्ड बँकेसाठी ठरवून दिलेले निकष पूर्ण करण्यासाठी बँक कसोशीने प्रयत्न करत आहे. बँकेला 45 कोटी हा आजवरचा उच्चांकी ढोबळ नफा यावर्षी झाला आहे.
बँकेने 944 कोटींचे कर्जवाटप केलेले आहे, तर 1552 कोटींच्या ठेवी गोळा केल्या आहेत. बँकेचा एकूण व्यवसाय 2496 कोटींचा झाला आहे. बँकेचा नेट एनपीए तब्बल अकरा वर्षांनंतर शून्य टक्के झाला आहे.
बँकेला लेखापरीक्षणात अ वर्ग मिळाला आहे. केंद्र शासनाच्या एमएसएमई अनुदानासाठी पात्र ठरलेली पुणे जिल्ह्यातील पहिली नागरी सहकारी बँक ठरली आहे. बँकेच्या या एकंदरीत कामगिरीचा विचार करून फेडरेशनने बँकेला हा पुरस्कार दिला आहे, असे ओसवाल यांनी सांगितले.





