मुंबई : लोढा ग्रुपचे माजी संचालक राजेंद्र लोढा यांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई फसवणूक आणि धमकीप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने केली आहे. राजेंद्र लोढा यांना मुंबईतील वरळी परिसरातून अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना २३ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. राजेंद्र लोढा हे लोढा ग्रुपचे संचालक होते. राजेंद्र लोढा हे मंगलप्रभात लोढा यांचे नातेवाईक असून लोढा ग्रुपचीच फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. राजेंद्र लोढा यांनी लोढा ग्रुपची ८५ कोटींची फसवणूक केल्याचे एफआयआरमध्ये नमूद करण्यात आलेले आहे. अधिकार नसतानाही राजेंद्र लोढा यांनी अनेक ठिकाणी जमीन अधिग्रहण करून आणि लोढा ग्रुपमधील अनेक फ्लॅट परस्पर विकून जंगम मालमत्ता कमावल्याचे समोर आले आहे. राजेंद्र लोढा यांनी मंगलप्रभात लोढा यांचे सुपुत्र अभिषेक लोढा यांनाही जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. आपल्यावर लोढा ग्रुपकडून कारवाई होणार असल्याचे लक्षात आल्यानंतर राजेंद्र लोढा यांनी आपल्या हस्तकाला अभिषेक लोढा यांच्याकडे पाठवले होते. या व्यक्तीने मी एक सुसाईड बॉम्बर असून राजेंद्र लोढा यांच्यावर कारवाई झाल्यास तुमचे बरे वाईट करणार असल्याची धमकी दिली होती. या सर्व प्रकरणात आता राजेंद्र लोढा यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.