पाटणा : बिहारमधील मतदानाचा वाढलेला टक्का एनडीएला सत्तेबाहेर जावे लागणार असल्याचे स्पष्ट संकेत देतो. यावेळच्या निवडणुकीत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह डझनभर मंत्र्यांचा पराभव निश्चित आहे, असे भाकीत कॉंग्रेसचे नेते राजीव शुक्ला यांनी केले. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आजवरच्या सर्वोच्च मतदानाची नोंद झाली. त्या घडामोडीचा आधार शुक्ला यांनी पत्रकार परिषदेत बोलताना घेतला. मतदानाची टक्केवारी वाढल्यास जनतेने परिवर्तनासाठी कौल दिल्याचे नेहमीच मानले जाते. त्या प्रथेची पुनरावृत्ती बिहारमध्ये होताना दिसेल. सत्ताधारी एनडीएची पीछेहाट होणार असल्याचे आम्हाला जमिनी स्तरावरून मिळणाऱ्या माहितीतून सूचित होत आहे. पहिल्या टप्प्यात १५ मंत्री रिंगणात होते. त्यांच्यापैकी १२ मंत्री पराभूत होतील. त्यामध्ये दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा समावेश असेल. मागील निवडणुकीत कॉंग्रेसला १९ जागा जिंकण्यावर समाधान मानावे लागले. मात्र, यावेळी पक्षाची कामगिरी उंचावेल, असा दावाही त्यांनी केला. कॉंग्रेस बिहारमधील विरोधकांच्या महाआघाडीचा घटक आहे. त्या महाआघाडीचे नेतृत्व राजद करत आहे. यावेळी सत्ताधारी एनडीएसमोर महाआघाडीने तगडे आव्हान उभे केल्याचे मानले जाते. महाआघाडीत ३ डाव्या पक्षांचा आणि विकासशील इन्सान पक्षाचाही समावेश आहे.