परळी विधानसभा निवडणूक धनंजय मुंडेंना जड जाणार? ‘या’ उमेदवाराच्या एन्ट्रीने वाढलं टेन्शन

बीड : विधानसभा निवडणुका अवघ्या 3 महिन्यांवर येऊन ठेपल्या आहे. राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. विधानसभेसाठी इच्छूक उमेदवारांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घ्यायाला सुरूवात केली आहे. या सगळ्यात बीडमधून मुंडे फॅमिलीचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे.
बीड लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या पंकजा मुंडे यांना विधान परिषदेचं तिकीट त्यांचं पुनर्वसन करण्यात आलं. परिणामी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते धनंजय मुंडे यांना परळी विधानसभा निवडणूक सोपी झाल्याचे दिसत होते. मात्र, आता राष्ट्रीय समाजवाजी पक्षाच्या उमेदवाराने परळी विधानसभा लढणार असल्याचे पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले. त्यामुळे आता धंनजय मुंडे यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
‘हा’ उमेदवार देणार धनंजय मुंडेंना आव्हान
राष्ट्रीय समाज पक्षाचे माजी युवक प्रदेशाध्यक्ष तथा गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांचे जावई राजेभाऊ फड हे परळी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे त्यानी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. फड हे भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. फड हे कन्हेरवाडी ग्रामपंचायतीचे सरपंचही राहिलेले आहेत. राजेभाऊ फड हे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उमेदवार राहिल्यास महायुतीला मोठा फटका बसू शकतो.





