पंजाबशी राजस्थानचा आज सामना

मुंबई  -आयपीएल स्पर्धेत यंदा राजस्थान रॉयल्सचा संघ गेल्या काही वर्षांइतका तुल्यबळ नाही. कर्णधार संजू सॅमसन आणि स्टिव्ह स्मिथसारखे धडाकेबाज फलंदाज असले तरीही पंजाब किंग्जच्या तगड्या फलंदाजीमुळे त्यांचेच पारडे या सामन्यात जड राहणार आहे. 

यंदाच्या आयपीएल स्पर्धेत सॅमसनकडे संघाची धुरा सोपवण्यात आल्याने अनेकांनी आश्‍चर्य व्यक्‍त केले होते. सॅमसनला अनुभव नसला तरीही त्याने देशांतर्गत क्रिकेट भरपूर खेळले असल्याने संघातील सर्व खेळाडू त्याला परिचित आहेत. त्यामुळे तो नव्या जुन्या खेळाडूंची चांगली मोट बांधेल असा विश्‍वास वाटतो.

तसेही शेन वॉर्नच्या नेतृत्वाखालील राजस्थान संघाने जसे विजेतेपद मिळवले होते, ती ताकद आज त्यांच्या संघाकडे राहिलेली नाही. सॅमसनच्या जोडीला बेन स्टोक्‍स, शिवम दुबे, जोस बटलर, यशस्वी जयस्वाल, डेव्हिड मिलर व राहुल तेवतिया असे सरस फलंदाज त्यांच्या संघात आहेत.

त्यांच्या गोलंदाजीचा आढावा घेतला तरीही असेच काहीसे चित्र दिसते. जयदेव उनाडकट, ऍण्ड्रयू टाय, मिस्तफिजूर रेहमान, कार्तिक त्यागी असे चांगले गोलंदाज असले तरीही ते पंजाबच्या बलाढ्य फलंदाजीला रोखण्यात किती यशस्वी होतील याची शंकाच आहे. त्यातही ख्रिस मॉरिस या खेळाडूला यंदाच्या स्पर्धेत सर्वात जास्त रकमेचा करार देत त्यांनी आपल्या संघात घेतले असले तरीही त्याच्याकडे एक ओव्हररेटेड खेळाडू म्हणूनच पाहिले जाते.

जागतिक क्रिकेटमध्ये पहिल्या दहा खेळाडूंच्या क्रमवारीतही त्याला सातत्याने आपले स्थान टिकवता आलेले नाही. या स्पर्धेतून त्यांचा प्रमुख वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला दुखापतीने संपूर्ण माघार घ्यावी लागल्याने त्यांची नव्या चेंडूवरची वेगवान गोलंदाजी कमकुवत बनली आहे. एकमेक दिलासादायक गोष्ट म्हणजे त्यांच्या संघात नवोदित श्रेयस गोपाल हा फिरकी गोलंदाज आहे आणि त्याने यंदा देशांतर्गत स्पर्धांमध्ये कमालीचे सातत्य राखले आहे.

दुसरीकडे पंजाबच्या संघात कर्णधार लोकेश राहुल, मयंक आग्रवाल, ख्रिस गेल, ख्रिस जॉर्डन, डेव्हिड मलान, सर्फराज खान व निकोलस पुरन अशी अत्यंत बलाढ्य फलंदाजी असल्याने त्यांना कसे रोखायचे यावर राजस्थानच्या गोलंदाजांना काथ्याकूट करावा लागणार आहे.

शाहरुख खान लक्षवेधी ठरेल
यंदाच्या स्पर्धेत सुरुवातीला नवोदित शाहरुख खान या खेळाडूला आपल्या संघात घेतल्यावर संघ मालक असलेल्या अभिनेत्री प्रीती झिंटा हिला ट्रोल केले गेले होते. तिने बॉलीवूडमध्ये अनेक चित्रपटांत प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान याच्यासह काम केले व संघात लिलावात निवडलेल्या खेळाडूचे नावही तेच असल्याने चाहत्यांनी तिची फिरकी अनेकदा घेतली. हा खेळाडू मात्र अफाट गुणवत्तेचा आहे. केवळ पंचवीशीतील या खेळाडूने आपल्या ऑफ स्पीन गोलंदाजीने भल्या भल्या खेळाडूंना सुखद धक्‍का दिला आहे. खुद्द विक्रमादित्य सुनील गावसकर यांनीही त्याचे कौतुक केले आहे. एक गोलंदाज म्हणून तो जितका प्रतिभावान आहे, तेवढाच उपयुक्‍त फलंदाज म्हणूनही त्याने देशांतर्गत स्पर्धेत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.

सामन्याची वेळ – 

सायंकाळी : 7ः30
ठिकाण ः वानखेडे स्टेडियम, मुंबई
थेट प्रक्षेपण ः स्टार स्पोर्ट्‌सवर

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.