Rajasthan Politics : “..अन्यथा CM गेहलोत तुरुंगात असते”; माजी मंत्री राजेंद्र गुढा यांचे स्पष्टीकरण

जयपूर :- कॉंग्रेस नेते धर्मेंद्र राठौर यांच्याविरुद्ध अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि आयकर छाप्यांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार मी एक गोपनीय ‘लाल डायरी’ सुरक्षित ठेवली होती. हे केले नसते तर मुख्यमंत्री अशोक गेहलोत तुरुंगात गेले असते. मला पदावरून हटवण्यापूर्वी स्पष्टीकरण देण्याची संधीही देण्यात आली नाही, असे स्पष्टीकरण माजी मंत्री राजेंद्र गुढा यांनी दिले आहे.
सैनिक कल्याण (स्वतंत्र प्रभार), गृहरक्षक आणि नागरी संरक्षण, पंचायती राज आणि ग्रामीण विकास राज्यमंत्री असलेले गुढा यांना विधानसभेत कायदा आणि सुव्यवस्थेवर राज्य सरकारला कोंडीत पकडल्यानंतर काही तासांनी शुक्रवारी संध्याकाळी मंत्रिमंडळातून काढून टाकण्यात आले होते.
झुंझुनू जिल्ह्यातील एका कार्यक्रमाला संबोधित करताना गुढा म्हणाले की, गेहलोत यांनी मला राजीनामा देण्यास सांगण्याऐवजी थेट बडतर्फ केले.
तुम्ही (गेहलोत) मला राजीनामा देण्यास सांगितले असते तर मी लगेचच राजीनामा दिला असता…शिवाय गेहलोत यांनी मला फोन करून नोटीस द्यायला हवी होती. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना गुढा भावविवश झाले.





