Rajasthan Election: राजस्थानमध्ये चुरशीची लढत; भाजपकडून बैठकांचे सत्र सुरू

जयपूर – या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या राजस्थान निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरशीची लढत होत आहे. दोन्ही पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी शनिवारी राजस्थानमधील पक्षाच्या नेत्यांची कोअर बैठक घेऊन या राज्यातील निवडणूक तयारीचा आढावा घेतला. या बैठकीला केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, गजेंद्रसिंह शेखावत, राज्य युनिटचे प्रमुख सीपी जोशी, माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे आणि राजस्थानचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते.
या बैठकीत लोकसंपर्कासाठीची रणनीती तसेच अन्य बाबींवर चर्चा झाली. पंतप्रधान मोदींच्या सभांच्या नियोजनावरही यावेळी चर्चा झाली. राजस्थानातील तयारीचा पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी आढावा घेतला असला तरी राजस्थान भाजपमध्ये मोठी गटबाजी आहे. त्यातून पक्षाचे अनेक नेते अजून पुरेशा तयारीने मैदानात उतरलेले दिसत नाहीत. पक्षाच्या प्रमुख नेत्या वसुंधराराजेही अजून प्रचारात सक्रिय झालेल्या नाहीत. त्यांच्या समर्थकांना दुय्यम वागणूक दिली जात असल्याची तक्रार त्यांच्या गटाकडून केली जात आहे.





