Assembly election 2023 : राजस्थान कॉंग्रेस इलेक्शन मोडवर; बैठकांचा सुरू केला सपाटा…

जयपूर :- राजस्थान कॉंग्रेस वेगाने इलेक्शन मोडवर गेली असून त्यांनी बैठकांचे सत्र अवलंबले आहे. स्क्रीनिंग कमिटीचे अध्यक्ष गौरव गोगोई आणि पक्षाच्या इतर नेत्यांनी सोमवारी(दि.२८) राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जयपूरमध्ये बैठक घेतली.
या बैठकीला प्रदेश अध्यक्ष गोविंद सिंग दोतासरा आणि सहप्रभारी अमृता धवन हेदेखील उपस्थित होते.
सोमवारी गौरव गोगोई यांच्यासह प्रदेशाध्यक्ष गोविंद दोतासरा आणि दोन्ही स्क्रीनिंग कमिटीचे सदस्य रात्री 8.30 वाजेपर्यंत सुमारे 10 तास मंथन करत राहिले. आजही स्क्रिनिंग कमिटी सकाळी 10:00 वाजल्यापासून विचारमंथन सुरू करेल जे संध्याकाळी 6:00 वाजेपर्यंत चालेल. आज स्क्रीनिंग समिती अजमेर, बिकानेर, सीकर आणि जयपूर विभागातील वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहे. तिकिटासाठी पात्र ठरलेल्या नेत्याची निवड होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कॅबिनेट मंत्री प्रताप सिंह खाचरियावास, ममता भूपेश, टिकाराम ज्युली, गोविंदराम मेघवाल, रमेश मीना, मुरारी लाल मीना, हे देखील तिथे उपस्थित होते. कॉंग्रेसने येथे एक वॉर रूमही स्थापन केली आहे. कोणते प्रमुख मुद्दे घेऊन जनतेपुढे जायचे, उमेदवार निवडीचे निकष काय ठेवायचे अशा बाबींवर चर्चा केली जात आहे.
भाजपचा अपप्रचार जोरदारपणे खोडून काढण्यावरही लक्ष दिले जाणार आहे. गेहलोत सरकारने राज्यातील गरिबांना पाचशे रुपयांमध्ये गॅस सिलिंडर देण्याचा योजना सुरू केली आहे, त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे, असे कॉंग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे.
राजस्थानमधील वातावरण कॉंग्रेसच्या बाजूने असून, यावेळी कॉंग्रेस निश्चितपणे निवडणूक जिंकून सरकारची पुनरावृत्ती करेल, असे या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी आलेल्या नेत्यांनी सांगितले.





