इस्लामाबाद : पाक व्याप्त काश्मीरच्या विधीमंडळातील पाकिस्तान पीपल्स पार्टीचे लोकप्रतिनिधी राजा फैसल मुमताझ राठोड यांना पीओकेचे पंतप्रधान म्हणून निवडण्यात आले आहे. पीओकेच्या विधीमंडळाने तेहरिक-ए-इन्साफ पक्षाच्या चौधरी अन्वर हक यांच्याविरोधात अविश्वास ठराव स्वीकारल्यानंतर नवीन पंतप्रधानांची निवड करण्यात आली. पीओकेच्या सध्याच्या विधीमंडळाचा कार्यकाळ २०२१ पासून सुरू झाला. तेंव्हापासून राजा फैसल मुमताझ राठोड हे पीओकेच्या वर्तमान विधीमंडळातील चौथे पंतप्रधान आहेत. त्यांना ३६ लोकप्रतिनिधींचा पाठिंबा आहे. त्यामध्ये पीपीपीचे २७ आणि पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ गटाचे ९ सदस्य आहेत. पीओकेच्या विधीमंडळात ५२ सदस्य असून नवीन नेत्यात्या निवडीसाठी सभागृहातील २७ सदस्यांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. पीटीआयच्या चौधरी अन्वर हक यांच्याविरोधात पीपीपीच्या कासिम मजीद यांनी सोमवारी अविश्वास ठराव मांडला होता. रविवारी पीटीआयचे दोन सदस्य पीपीपीमध्ये सामील झाले. त्यामुळे पीपीपीची सदस्य संख्या २९ झाली. ऑक्टोबरमध्ये पीटीआयचे १० सदस्य पीपीपीमध्ये सामील झाले होते. त्यामुळे पीपीपीची सदस्य संख्या वाढून २७ झाली होती. ऑगस्ट २०२१ मध्ये पीटीआयने अब्दुल कय्यूम नियाझी यांची पीओकेच्या पंतप्रधान म्हणून निवड केली होती. मात्र ९ महिन्यांनंतर नियाझी यांच्या जागेवर पीटीआयचे प्रदेशाध्यक्ष सरदार तन्वीर इलियास यांची निवड करण्यात आली. एप्रिल २०२३ मध्ये तन्वीर यांना न्यायालयाने अपात्र ठरवले आणि त्यांच्या जागेवर हक यांची निवड करण्यात आली होती.