Raj Thackeray : गर्जना मोर्चात राज ठाकरेंच्या दोन मोठ्या मागण्या; म्हणाले….
Raj Thackeray : हातात तिरंगा घेतलेल्या कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीविरोधात घोषणाबाजी केली.

Raj Thackeray : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीविरोधात ठाकरे बंधूंनी मुंबईत ‘गर्जना मोर्चा’ काढला. या मोर्चाच्या माध्यमातून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. मोर्चात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. हातात तिरंगा घेतलेल्या कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीविरोधात घोषणाबाजी केली.
‘लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी गर्जना’ असा या मोर्चाचा संदेश देण्यात आला. मोर्चाच्या समारोपावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक प्रक्रियेबाबत दोन प्रमुख मागण्या केल्या. महाराष्ट्रात झालेली SIR म्हणजेच विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया रद्द करावी आणि EVM ऐवजी पुन्हा बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे.
या दोन्ही मागण्यांवर निर्णय झाल्यास निवडणूक प्रक्रियेबाबतचे सत्य स्पष्ट होईल, असा दावा राज ठाकरे यांनी केला. महाराष्ट्रातील मतदार यादीत मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचा आरोपही राज ठाकरे यांनी केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, राज्यात ४० ते ६० लाख मतदार वाढवण्यात आले. मागील काही वर्षांपासून आपण मतदार याद्यांमधील अनियमिततेचा मुद्दा उपस्थित करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज ठाकरे यांनी २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाचाही संदर्भ दिला. निवडणुकीनंतर राज्यात जल्लोषाऐवजी सन्नाटा दिसून आल्याचे सांगत त्यांनी, “हा कसला विजय?” असा सवाल उपस्थित केला.
निवडणूक प्रक्रियेतील अनियमिततेबाबत आपण यापूर्वी सोनिया गांधी, ममता बॅनर्जी यांच्यासह इतर नेत्यांची भेट घेऊन मतदान यंत्रणा आणि मतदार याद्यांबाबत चिंता व्यक्त केली होती, असेही राज ठाकरे यांनी सांगितले. दरम्यान, ठाकरे बंधूंच्या या मोर्चात शिवसेना (उद्धव ठाकरे गट), मनसेसह इतर विरोधी पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.





