Raj Thackeray : राज ठाकरेंची स्थिती गझनीसारखी; राष्ट्रवादीचा मनसेवर पलटवार

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून अजित पवारांवर निशाणा साधल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. राज ठाकरे यांची स्थिती गझनीच्या हिरोसारखी झाली आहे. त्यांनी अजित पवारांवर बोलू नये. कारण ते उठ दुपारी आणि घे सुपारी वाले नाहीत, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी म्हटले आहे.
राज ठाकरे यांनी गुरुवारी मनसेच्या मेळाव्यात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधानसभा निवडणुकीतील यशावर भाष्य केले होते. लोकसभा निवडणुकीत अजित पवारांचा केवळ 1 खासदार निवडून आला होता. त्यानंतर चारच महिन्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे 42 आमदार निवडून आले. हे कसे घडले? हा सर्व प्रकार संशयास्पद आहे, असे ते म्हणाले होते.
स्वतःच्या घरात दारुण पराभव झालेल्या लोकांनी आम्हाला शिकवू नये. राज ठाकरे यांना उशिरा उठून चिंतन करण्याची सवय आहे. त्यांनी स्वतःच्या मुलाचा पराभव का झाला? यावर बोलावे. अजित पवारांसारखे पहाटे 6 वा. उठून काम करावे, असे ते राज ठाकरे यांना टोला हाणताना म्हणालेत.
सुरज चव्हाण म्हणाले, त्यांनी भाषणाला येताना आपण 2009, 2014, 2019 व 2024 साली काय विधाने केली ते तपासून पहावे. ते त्यांना पुढील काळात भाषण करताना उपयोगी ठरेल. गझनीसारखे लगेच विसरण्यापेक्षा त्यांच्या लक्षात राहील.
राज ठाकरेंवर जनतेचा भरवसा नाही
एनसीपीचे नेते आनंद परांजपे यांनीही या प्रकरणी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, राज यांची भूमिका कायमच बदलणारी राहिली आहे. त्यांचा पक्ष ऋतुसारखा आपली भूमिका बदलतो. त्यांनी आपला पक्ष व चिन्ह राहिल की नाही याची चिंता करावी. त्यांना 128 जागा लढवून केवळ 1.55 टक्के मते मिळाली. त्यामुळे त्यांनी आमच्यावर बोलण्यापक्षा स्वतःच्या पक्षावर लक्ष द्यावे. महाराष्ट्रातील जनतेलाही मनसे व राज ठाकरे यांच्यावर भरवसा राहिला नाही. परिणामी, विधानसभेत त्यांचा एकही प्रतिनिधी राहिला नाही.





