राज ठाकरेंची 16 वर्षांपूर्वीच्या खटल्यातून निर्दोष मुक्तता; काय होतं प्रकरण? जाणून घ्या..

Raj Thackeray| महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे 2008 साली केलेल्या आंदोलनानंतर दाखल झालेल्या गुन्ह्यातून त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या प्रकरणाचा मागील 16 वर्षांपासून खटला सुरू होता. अखेर या प्रकरणातून त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. इस्लामपूर न्यायालयाने हा निकाल दिला आहे
शिराळा तालुक्यातील शेंडगेवाडी या ठिकाणी 2008 साली रेल्वे भरती प्रकरणी मराठीच्या मुद्द्यावरून केलेल्या आंदोलना दरम्यान हिंसक प्रकार घडला होता. याप्रकरणी कोकरूड पोलिस ठाण्यामध्ये मनसेच्या जिल्हाध्यक्षांसह राज ठाकरेंच्या विरोधात देखील गुन्हा दाखल झाला होता.
याप्रकरणी शिराळा न्यायालयाने राज ठाकरेंना दोन वेळा अजामीनपात्र वॉरंटही बजावले होते. अखेर मनसे आंदोलनप्रकरणी दाखल गुन्ह्याच्या खटल्यातून राज ठाकरे यांना इस्लामपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषमुक्त करण्यात आल्याने मनसे कार्यकर्त्यांकडून आनंद साजरा केला जात आहे. इस्लामपूर सत्र न्यायालयाने शेंडगेवाडी खटल्यातून राज ठाकरे यांना दोष मुक्त करण्यात येत असल्याचा निकाल दिला आहे.
काय होतं प्रकरण?
2008 मध्ये राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्द्यावरुन रेल्वे भरतीला विरोध करत आंदोलन उभारले होते. या आंदोलनाचे पडसाद सर्वत्र उमटले होते. मराठी मुलांना संधी द्यावी यासाठी मनसेनं महाराष्ट्रभर आंदोलन सुरू केले होते. मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिराळा तालुक्यातल्या शेडगेवाडी येथे करण्यात आलेल्या आंदोलन दरम्यान हिंसक वळण लागलं होतं. या प्रकरणी राज ठाकरे यांच्यासह शिरीष पारकर व सांगली जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांच्यासह मनसे कार्यकर्त्यांच्या विरोधात शिराळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.





