महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरील सर्वात बहुचर्चित युती अखेर झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे दोन पक्ष आगामी महापालिका निवडणुका युती म्हणून लढवणार असल्याची अधिकृत घोषणा या दोन्हीही बंधूंनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे. जवळजवळ वीस वर्षांच्या कालावधीनंतर हे दोन ठाकरे बंधू एकत्र निवडणूक लढवणार असल्याने महाराष्ट्राच्या राजकारणावर विशेषतः महानगरांमधील राजकारणावर त्याचा काय परिणाम होतो हे पाहणे निश्चितच महत्त्वाचे ठरणार आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाल्यानंतर राज्यात जी एक विरोधी पक्षांची पोकळी तयार झाली होती ती भरून काढण्याचे काम निश्चितच ठाकरे बंधू करू शकतात. राजकारण हा शेवटी स्पेस मिळवण्याचा आणि ती टिकवून वाढवण्याचा खेळ असल्याने उद्धव ठाकरे असतील किंवा राज ठाकरे असतील महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपापली स्पेस मिळवणे आणि ती मजबूत करणे याच एका हेतूने एकत्र आले आहेत याबाबत शंका घेण्याचे कारण नाही. याच वर्षी महाराष्ट्रामध्ये जेव्हा हिंदी भाषेची सक्ती करण्याचा विषय समोर आला होता तेव्हाच सर्वप्रथम राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले होते. या विषयावर मुंबईमध्ये एक मोठा मोर्चाही एकत्रपणे काढण्यात आला होता. त्यानंतर या दोन बंधूंच्या सातत्याने गाठीभेटी होत्या आणि दरवेळी उद्धव ठाकरे स्वतःहून आम्ही एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी असे सातत्याने सांगत होते. नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकांमध्ये या दोन पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला नव्हता. पण नगरपरिषदा निवडणुकीमध्ये महायुतीने चांगले यश मिळवल्यानंतर मात्र महापालिका निवडणुकांमध्ये एकत्र येणे गरजेचे आहे यावर एकमत झाल्यानेच अखेर त्यांनी एकत्रपणे निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे. देशातील सर्वात मोठी महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवणे हे सर्वात मोठे ध्येय उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचेही आहे आणि या निवडणुकीच्या निमित्ताने महापालिकेमध्ये आपलाही सत्तेमध्ये सहभाग असावा असे राज ठाकरे यांनाही वाटत आहे. सध्याच्या कालावधीमध्ये लोकसभा असो, विधानसभा असो किंवा नगरपरिषदा असो तेथे कोठेच उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे यांच्या पक्षाची सत्ता नाही. या परिस्थितीमध्ये जर मुंबई, ठाणे, नाशिक किंवा पुणे यासारख्या मोठ्या महानगरपालिकांमध्ये सत्ता मिळाली तर एक महत्त्वाचे सत्ताकेंद्र हाती येईल आणि कार्यकर्त्यांच्या मानसिकतेवरही सकारात्मक परिणाम होईल असेच ठाकरे बंधूंना वाटत आहे. खरे तर बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेनेचे काय होईल असे वाटत असताना उद्धव ठाकरे यांनी हा पक्ष अत्यंत सक्षमपणे हाताळला होता, त्याचा विकास आणि संघटनही मजबूत केले होते. दुसरीकडे शिवसेनेतून बाहेर पडून स्वतःची वेगळी शाखा निर्माण करणारे राज ठाकरे यांना प्रारंभीच्या कालावधीमध्ये चांगले यश मिळाले. पण त्यानंतर त्यांना यशातील सातत्य टिकवता आले नव्हते. त्यांच्या बदलत्या भूमिकेवर नेहमी संशय घेण्यात आला होता. उद्धव ठाकरे यांनी राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग केल्यानंतर राज्याच्या राजकारणात वेगळी दिशा मिळाली होती. राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले होते त्यापेक्षा मोठी हानी एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडल्यामुळे झाली. त्यांनी पक्षावरच दावा ठोकला आणि पक्ष ताब्यात घेतला. अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये एकनाथ शिंदे यांनीसुद्धा आपले संघटन मजबूत केले आहे हे नगरपरिषदा निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट होते. आता महापालिकांच्या संग्रामामध्ये तरी आपण सत्तेवर येण्याचा प्रयत्न करूया या विचारानेच ठाकरे बंधूंमधील ही युती झाली आहे. गेली 25 वर्षे मुंबई महापालिकेवर सत्ता असलेल्या शिवसेनेला या कालावधीमध्ये भाजपाची साथ मिळाली होती. यावेळी प्रथमच भाजपाच्या सहकार्याशिवाय ही निवडणूक लढवली जाणार आहे. मुंबईत राहतो तो मराठी माणूस अशी भूमिका त्या दोघाही नेत्यांनी घेतलेली दिसते. साहजिकच मराठी माणसाबाबत आणि अमराठी माणसांबाबत राज ठाकरे यांची जी भूमिका आहे त्याबाबत त्यांना थोडी तडजोड करावी लागेल असेही दिसते. ही निवडणूक भावनांवरच लढवावी लागणार आहे याची कल्पना ठाकरे बंधूंना असल्यामुळे ही महायुतीची घोषणा करतानाही दोन्ही ठाकरेंचे कुटुंब एकत्र व्यासपीठावर आले होते हे जास्त महत्त्वाचे आहे. त्यातून योग्य भावनिक संदेश देण्याचे काम या बंधूंनी केले आहे. एक गोष्ट निश्चित आहे ही युती झाल्यानंतर महायुतीचे घटक पक्षही सावध झाले आहेत. कोणत्याही परिस्थितीत मुंबई आणि इतर महापालिकांवर सत्ता मिळवायची ही त्यांचीही मनीषा आहे. साहजिकच येत्या कालावधीमध्येच म्हणजेच महापालिका निवडणुकांचा निकाल लागल्यानंतरच राज्यात आकाराला आलेल्या या नव्या समीकरणांचा अर्थ निश्चित काय हे समजणार आहे.