मुंबई : तब्बल १८ वर्षांनंतर ठाकरे कुटुंबियांचं एकत्र येणं आता प्रत्यक्षात उतरल आहे. शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ‘शिवतीर्थ’वर जाऊन भेट घेतली. या भेटीत दोन्ही पक्षांनी राज्यातील सहा मोठ्या महापालिका निवडणुका एकत्र लढवण्याचा अंतिम निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे. तसेच ठाणे महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने ठाकरेंच्या शिवसेनेकडून राजन विचारे, तर मनसेकडून अविनाश जाधव यांना जागा वाटपाची चर्चा करण्याची जबाबदारी दिली आहे. तसेच कल्याण-डोंबिवली महापालिकेमध्ये मनसेचे माजी आमदार राजू पाटील, तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून आमदार वरूण सरदेसाई यांच्याकडे जागा वाटपाच्या चर्चेची जबाबदारी असणार आहे. या सहा जागा लढणार एकत्र 1. बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) 2. ठाणे महानगरपालिका 3. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका 4. नवी मुंबई महानगरपालिका 5. पुणे महानगरपालिका 6. नाशिक महानगरपालिका मराठीबहुल वॉर्ड्सवरून रस्सीखेच सुरू सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनसेने मराठीबहुल प्रभागांमध्ये आपली ताकद वाढवण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. विशेषतः दादर-माहिम, वरळी, शिवडी, भायखळा, भांडूप, जोगेश्वरी अशा पारंपारिक शिवसेना बालेकिल्ल्यात मनसेने २०-२५ विद्यमान नगरसेवकांच्या जागांची मागणी केली आहे. अगदी शिंदे गटात गेलेल्या काही नगरसेवकांच्या जागांवरही मनसेने दावा ठोकला आहे. शिवसेना (उबाठा) मात्र ‘जिंकण्याची खात्री असलेलीच जागा देऊ’ असा पवित्रा घेऊन आहे. त्यामुळे जागा वाटपाचा अंतिम आराखडा अद्याप ठरलेला नाही. दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये यावर आणखी काही फेऱ्या चर्चा होणार आहे. भाजप-शिंदे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता ही युती जर पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरली तर भाजप-शिंदे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. विशेषतः मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकसारख्या शहरांमध्ये मराठी माणसाच्या मुद्द्यावर दोन्ही ठाकरे एकत्र आल्यास विरोधकांसाठी मोठं आव्हान निर्माण होणार आहे.