मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) ज्येष्ठ नेते आणि माजी प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला आहे. मनसेतून बाहेर पडल्यानंतर त्यांच्या पुढच्या राजकीय भूमिकेकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने ते भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, आता या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला असून, महाजन यांनी शांतपणे शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. प्रकाश महाजन हे राज ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते. मनसेच्या स्थापनेपासून ते पक्षात सक्रिय होते आणि पक्षाचे अधिकृत प्रवक्ते म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र, गेल्या काही काळापासून पक्षातील अंतर्गत मतभेद, कार्यपद्धतीबाबतची नाराजी आणि काही निर्णयांबाबतची असहमती यामुळे ते अस्वस्थ झाले होते. यातूनच त्यांनी १३ सप्टेंबर रोजी मनसेचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यामुळे मनसेला मोठा धक्का बसल्याची जोरदार चर्चा त्यावेळी राजकीय वर्तुळात रंगली होती. मनसेतून बाहेर पडल्यानंतर महाजन नेमका कोणता मार्ग स्वीकारणार, याबाबत उत्सुकता होती. बुधवारी (२५ डिसेंबर) त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि शिवसेनेत प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली. अवघ्या एका दिवसात त्यांचा शिंदे गटात अधिकृत प्रवेश पार पडला. विशेष म्हणजे, हा प्रवेश कोणत्याही मोठ्या समारंभ किंवा गाजावाजाविना अत्यंत शांतपणे झाला. ऐन महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर झालेल्या या प्रवेशामुळे राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आगामी महापालिका निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल, याकडे लक्ष लागले आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील युतीची घोषणा झाल्यानंतरही भाजप आणि शिंदे शिवसेनेत नेते-कार्यकर्त्यांचे मोठ्या प्रमाणात आगमन सुरू आहे. प्रकाश महाजन यांचा प्रवेश हा महायुतीच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. मनसेतून बाहेर पडताना प्रकाश महाजन यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. वय वाढत असताना पक्षात काही गोष्टी मनाविरुद्ध घडत असल्याने राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले. कोणावरही वैयक्तिक राग नसल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच, आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (RSS) जोडलेले असल्याचे कधीही लपवले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संघाच्या संदर्भात बोलताना “राज ठाकरे यांना घाबरत नाही” असे ठाम शब्दांत सांगितले होते. आता शिंदे शिवसेनेतील प्रवेशानंतर राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.