“राज ठाकरेंची तयारी नाही, फक्त बोलतात”; बावनकुळेांचा टोला, महायुतीची 51% मतांची घोषणा

मुंबई – भाजप व मित्रपक्ष म्हणजेच महायुतीने ५१ टक्के मतदानाची तयारी केली आहे. विधानसभेत देखील आम्हाला ५१.७८ टक्के मते मिळाली होती. राज ठाकरे व त्यांचे मित्र पक्ष काय तयारी करत आहेत, हे मला माहिती नाही, मात्र, आमची तयारी झाली आहे. कोणीही आले, आणि लढते तरी ५१ टक्के मते महायुतीच घेणार असा विश्वास भाजप नेते व महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.
आगामी निवडणुकांचे वेध सर्वच राजकीय पक्षांना लागले असून प्रत्येकाने आपल्या परीने तयारीला सुरुवात केली आहे.
मुंबई महानगरपालिका आपल्या ताब्यात घेण्यासाठी भाजपने कंबर कसली असून, ठाकरेंच्या ताब्यातून ती जावू नये यासाठी उद्धवसेना प्रयत्नशील आहे. मुंबईत उद्धवसेना व मनसे एकत्र येण्याच्या हालचालींनी वेग पकडला आहे. त्यातच मनसेचे सर्वेसर्वा असलेल्या राज ठाकरेंनी मुंबईत पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेताना, तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत, याबरोबरीने उद्धवसेना व मनसे कार्यकर्त्यांनी हेवेदावे विसरून काम करावे असे देखील आवाहन त्यांनी केले आहे. यापार्श्वभूमीवर बोलताना बावनकुळेंनी आमची ५१ टक्क्यांची तयारी पूर्ण झाल्याचे सांगितले.
बावनकुळे म्हणाले की, एकही जागा काँग्रेस किंवा शरद पवार आणि ठाकरे यांच्या पक्षाला मिळणार नाही. कारण जनतेने स्वीकारले आहे की, नरेंद्र मोदी हे देशाला समृद्ध करत आहेत. तर देवेंद्र फडणवीस ते महाराष्ट्राला विकसित करत आहेत. त्यामुळे, जनता विकासासोबत जाणार आहे, असा विश्वास बावनकुळे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत व्यक्त केला आहे.
ज्यांची तयारी नाही तेच बोलतात –
मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांशी बोलताना, आपलीच सत्ता येणार असल्याचे सांगितले. त्यावरुन देखील बावनकुळेंनी टोला लगावला. आम्ही पूर्ण तयारीनिशी आहोत. महराष्ट्रात भाजपचे दीड कोटी सदस्य आहेत, अजित पवार व एकनाथ शिंदे देखील तयार आहेत. विरोधक काय करणार ते माहिती नाही, मात्र आमची तयारी पूर्ण आहे. ज्यांची निवडणुकीला लढण्याची तयारी नाही, असेच लोक अशा प्रकरची विधाने करतात, असे म्हणत बावनकुळेंनी राज ठाकरेंना चिमटा काढला.





