प्रभात वृत्तसेवा पुणे – काम करायचे नसेल, तर पद सोडा, असा सज्जड दमच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला आणि त्यांची कानउघडणीही केली.ठाकरे यांच्या नेतृत्वात गुरुवारी पुण्यातील शाखाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत सर्व वरिष्ठ पदाधिकारी, शाखा अध्यक्ष उपस्थित होते. या बैठकीत ठाकरे यांनी बैठक सुरू होताच एका प्रमुख पदाधिकाऱ्याला त्याच्या सोशल मीडिया पोस्टवरून फटकारले, तसेच अन्य पदाधिकाऱ्यांना देखील अनेक प्रश्न विचारले. मतदार याद्या, तसेच पक्ष संघटनेच्या बाबतही पदाधिकारी आणि शाखा अध्यक्षांना प्रश्न विचारले. मात्र, त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे न आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.या वेळी पदाधिकाऱ्यांना आणि शाखा अध्यक्षांना देखील राज ठाकरे यांनी झापले. काम करायची इच्छा नसेल तर पद सोडा. इतके दिवस काय काम केले हे दाखवा, मतदार याद्या पूर्ण का केल्या नाहीत, अशा प्रश्नांची सरबत्ती त्यांनी केली. जे पदाधिकारी काम करणार नाहीत किंवा जबाबदाऱ्या पूर्ण करणार नाहीत, त्यांना काढून टाका. असे आदेशही दिले. ही बैठक दोन तासांसाठी नियोजित होती. शहरातील विविध प्रश्न, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, त्याविषयीची रणनीती, मतदार यादीतील गोंधळ याबाबत सविस्तर चर्चा आणि मार्गदर्शन हा या बैठकीचा अजेंडा होता. मात्र, बैठकीत विचारलेल्या प्रश्नांना निराशाजनक उत्तर मिळाल्याने ठाकरे यांनी काही मिनिटांतच बैठक उरकली आणि ते निघून गेले.