MNS Banner : मनसेच्या बॅनरवर झळकला बाळासाहेबांचा फोटो; राजकीय वर्तुळात रंगली चर्चा

मुंबई : मनसे दरवर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी पक्षाचा मेळावा घेत असते. या मेळाव्याची सध्या शिवाजी पार्कमध्ये तयारी सुरु आहे. मात्र यादरम्यान एका बॅनरने (MNS Banner) सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. मनसेच्या गुढीपाडावा मेळाव्याच्या बॅनरवर (MNS Banner) शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो झळकला आहे. बाळासाहेबांबरोबरच प्रबोधनकार ठाकरेंसहीत राज ठाकरे आणि अमित ठाकरेंचाही फोटो या बॅनरवर आहे. या बॅनरची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
माझा फोटो वापरायचा नाही – बाळासाहेब ठाकरे
राज ठाकरे जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडले तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी, “माझा फोटो वापरायचा नाही”, असे राज ठाकरे यांना सांगितले होते. तेव्हापासून आतापर्यंत मनसेने बाळासाहेबांचा फोटो वापरला नव्हता. मात्र आता मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्याच्या निमित्तानं शिवाजी पार्कात लागलेल्या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे, प्रबोधनकार यांचे फोटो लावण्यात आले आहेत.
उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
उद्धव ठाकरेंना जेव्हा या बॅनर संदर्भात विचारण्यात आले तेव्हा त्यांनी खोचक प्रतिक्रिया दिली. “आता सगळ्यांना कळतंय की बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाशिवाय पर्याय नाही. आता सगळेच पक्ष बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वापरत आहेत. त्यांना कळलं आहे की याशिवाय आता पर्याय नाही,” अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली.
मनसे हटवणार बॅनर
“ज्याने बॅनर लावला तो पक्षाचा सुरुवातीपासूनच कार्यकर्ता आहे. भावनेच्याभरात त्याने हे बॅनर्स लावले. बॅनर्स काढण्यात येतील,” असे मनसेचे पदाधिकारी यशवंत किल्लेदार म्हणाले आहेत. तसेच “ज्या तरुण कार्यकर्त्याने ही बॅनर लावले त्याच्याशी मी, संदीप देशपांडे आणि इतर नेत्यांनी संवाद साधला आहे. मुनाफ ठाकूर असे या कार्यकर्त्याचे नाव आहे. मनसेकडून हे बॅनर काढण्यात येतील असे यशवंत किल्लेदार म्हणाले आहेत.
राज ठाकरेंनी शिवसेना कधी सोडली?
राज ठाकरे यांनी 27 नोव्हेंबर 2005 रोजी शिवसेनेचा राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी तेव्हाच नवीन राजकीय पक्ष सुरू करणार असल्याचे जाहीर केले होते. यानंतर त्यांनी 9 मार्च 2006 रोजी मुंबईत राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची स्थापना केली. तेव्हापासून मनसेने आजपर्यंत कधीच बाळासाहेबांचा फोटो पोस्टरवर किंवा बॅनर्सवर (MNS Banner) वापरलेला नव्हता.





