नगर -राज्याचे घटलेले उत्पन्न वाढविण्यासाठी कोणत्याही करवाढीचा सरकार विचार करत नाही. सध्या केवळ करोनापासून लोकांचा जीव वाचवणे, हेच महत्त्वाचे आहे. करोनाशी लढण्यासाठी जो काही खर्च होईल तो सरकार करेल, अशी भूमिका महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केली. थोरात यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. करोना व खरीप हंगामाबाबत यावेळी आढावा घेण्यात आला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, करोनाच्या पार्श्वभूमीवर घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. औद्योगिकदुष्ट्या संपन्न राज्य असलेल्या महाराष्ट्राला लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका बसला. महसुली उत्पन्न कमी झाले. कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठीही राज्य सरकारला मोठी कसरत करावी लागत आहे. लॉकडाऊन आता हळूहळू शिथिल होत असले तरी ताबडतोब परिस्थिती बदलणार नाही. आणखी काही महिने आर्थिक मंदीचे आणि ओढग्रस्तीचे असतील. असे असले तरी सरकार कोणतीही करवाढ करण्याची शक्यता नाही. जनतेला करोनाच्या कचाट्यातून बाहेर काढण्यास आमचे प्राधान्य आहे. राज्याला आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्यासाठी मंत्रिमंडळाची समिती गठीत करण्यात आली आहे. ही समितीही आढावा घेत आहे. करोना रोखताना राज्याच्या अर्थव्यवस्थेला गती देण्याबाबत निर्णयसुद्धा घ्यावा लागणार आहे. त्या दृष्टीने मंत्रिमंडळामध्ये चर्चा सुरू आहे. खर्च कुठे कमी करता होईल. कुठून उत्पन्न वाढवता येईल, यावर चर्चा सुरू आहे, असे ते म्हणाले. आता हळूहळू व्यापार, उद्योग सुरू होऊ लागले आहेत. मुद्रांक विक्रीसुद्धा सुरू झाली आहे. त्यामुळे थोड्याफार प्रमाणात महसुली उत्पन्न सुरू झाले आहे, असेही ते म्हणाले. करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनला काही कठीण निर्णय घ्यावे लागत असतात. पण नागरिकांनी सुद्धा आता स्वयंशिस्त पाळणे गरजेचे आहे. कारण प्रशासन कुठपर्यंत तुमची काळजी घेणार, हा सुद्धा प्रश्न आहे. देशात महाराष्ट्रमध्ये करोना रुग्ण जास्त आहेत. पण यासाठी महाराष्ट्राला कोणी दोष देईल वाटत नाही. कारण महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. येथे विदेशातून येणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे, हे देखील लक्षात घ्यावे लागेल. त्यामुळे देशातील इतर राज्य व महाराष्ट्र यांची तुलना होऊ शकत नाही. करोना आता वाढू लागला आहे. तो का वाढतोय, या कारणांचा अभ्यास करीत आहोत,’ असे ना. थोरात म्हणाले. हवामान खात्याचे कौतुक हवामान खात्याचा अचूक अंदाज व त्यानंतर आपत्ती व्यवस्थापनाने केलेले कार्य कौतुकास्पद ठरले. निसर्ग चक्रीवादळाचा अंदाज हवामान खात्याने आधीच वर्तवला होता. त्यामुळे सर्व यंत्रणा अलर्ट होत्या. एनडीआरएफ टीम आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने सतर्कता दाखवल्याने जीवितहानी टळली. वादळ आल्यानंतरही जी काही थोडी पडझड झाली किंवा महामार्गावर झाडे पडली ते यंत्रणेने रात्रीतून दूर केली. त्यासह नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू असल्याचे थोरात म्हणाले.