पावसाचा प्रकोप! सीना नदीला पूर, सोलापूर-पुणे महामार्ग बंद, जनजीवन विस्कळीत

Solapur Rain | मराठवाड्यातील दुष्काळी गावांना अतिवृष्टीने झोडपल्यानं गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. नद्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने पुराचे पाणी गावांमध्ये शिरले आहे. यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीला इतिहासात पहिल्यांदाच पूर आला आहे. पुरामुळे अनेक नागरिकांना स्थलांतर करावे लागले आहे.
दरम्यान, सोलापूर-पुणे महामार्गावरील लांबोटी पूल रात्री 11.30 वाजल्यापासून बंद करण्यात आला आहे. येथे गाड्या सावळेश्वर टोल नाक्यावर अडवून ठेवल्या. पूल बांधल्यापासून पहिल्यांदाच वाहतूक बंद करण्याची वेळ आली आहे. परिणामी महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. दरम्यान, हा निर्णय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाने घेतला आहे.
सोलापूर-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुद्धा बंद
उत्तर सोलापूर तालुक्यातील शिवणी, तिर्हे आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील अकोले, राजूर, नांदूर, गावासह अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. उत्तर सोलापुरातील तिऱ्हे गावाजवळ सीना नदीच्या पुलावरून वाहतूक बंद केली आहे. सोलापूर-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुद्धा बंद केल्याची माहिती समोर येत आहे. सीना नदीचं पाणी ओसरेपर्यंत ही वाहतूक बंद राहण्याची शक्यता आहे. वाहतूक बंद असल्यानं दैनंदिन जनजीवन विस्कळीत झाले आहे.
रेल्वे वाहतुकीला फटका
सीना नदीच्या पुरामुळे रेल्वे वाहतुकीलासुद्धा फटका बसला आहे. सोलापूर विभागातील रेल्वे गाड्यांचा वेग सीना नदीवरील पुलावर ३० किमी प्रतितास इतका कमी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर करमाळा तालुक्यात मुंडेवाडी येथे पाणी रेल्वे पुलाजवळ पोहोचले आहे. सीना नदीला पूर आल्याने अनेक ठिकाणी रेल्वे रुळांवर पाणी आले आहे. वंदे भारत एक्सप्रेस आणि हुतात्मा एक्सप्रेस या दोन्ही गाड्या मार्गस्थ न झाल्याने सोलापूर रेल्वे स्थानकावर अनेक प्रवाशी रात्रीपासून ताटकळत बसले आहेत.
शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा
दरम्यान, राज्यातील मराठवाडा विदर्भ आणि सोलापूर जिल्ह्यात पावसाने थैमान घातलं आहे. या भागातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं असून बळीराजा हवालदिल झाला आहे. मदतीची वाट पाहत आहे. काल मुंबईत मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. Solapur Rain |
या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा केली. तसेच संबंधित जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याचं आवाहन केलं होतं. त्यानुसार महायुती सरकारमधील सर्व मंत्री पालकमंत्री संबंधित जिह्याच्या पाहणी दौऱ्यावर आले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: अतिवृष्टीचा फटका बसलेल्या जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. माढा तालुक्यातील निमगाव, दारफळ या गावांसह लातूरमधील उजनी, औसा या भागातही दौरा करणार आहेत. Solapur Rain |
हेही वाचा:
रितेश, विवेक आणि आफताबची पुन्हा ‘मस्ती 4’; ‘या’ दिवशी रिलीज होणार चित्रपट





