Indonesia – इंडोनेशियामध्ये संततधार पावसामुळे पूर आणि भूस्खलनाने हाहाकार उडवला अजून मदत आणि बचाव पथकांना अजूनही बऱ्याच ठिकाणी मदत पोचवता आलेली नाही. अतिवृष्टीमुळे आतापर्यंत किमान २७९ जणांचा मृत्यू झाला असून हा आकडा यापेक्षाही वाढू शकतो, अशी भीती प्रशासनाकडून व्यक्त केली जाते आहे. पुरामुळे रस्ते वाहून गेले असल्यामुळे उत्तर सुमात्राशी आणि सखल भागातील वहाहतींशी असलेला संपर्क तुटला आहे. या भागात मदत साहित्य पोचवण्यासाठी आता केवळ हवाई मार्गावर अवलंबून रहावे लागते आहे. मदतीसाठी आवश्यक असलेल्या अवजड यंत्रसामुग्रीचा तुटवडा असल्यामुळे मदत आणि बचावकार्यावर देखील परिणाम झाले आहेत. उत्तर सुमात्रा येथून पचाव पथकांना ३१ मृतदेह सापडले आहेत. अजूनही १७४ जण बेपत्ता असून विस्थापितांसाठी सरकारने सुरू केलेल्या तात्पुरत्या छावण्यांमध्ये २८,४०० लोकांनी आश्रयघेतला आहे. बेपत्ता असलेल्यांच्या त्यांच्या शोधासाठी आणि मदतीसाठी ३,५०० पोलीस कर्मचारी तैनात केले गेले आहेत. गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या ंसततधार पावसामुळे नद्या दुथडी भरून वहात आहेत. डोंगरपायथ्याची गावे पुरात वाहून गेली असून शेकडो घरे आणि इमारती पुराच्या पाण्याखाली बुडाल्या आहेत. पश्चिम सुमात्रा प्रांतातील आगम जिल्ह्यात ३ गावातील ८० लोक बेपत्ता झाले आहेत. या गावांवर दरडी कोसळल्याने अनेक घरे चिखल आणि मातीच्या ढिगाऱ्यांखाली गाडली गेली आहेत. पुराच्या पाण्यात अनेक झाडांचे ओंडके वाहून आल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या भागात बेकायदेशीरपणे झाडांची कत्तल होत असल्याचे उघड झाले आहे. ११ डिसेंबरपर्यंत आणीबाणी अतिवृष्टीमुळे इंडोनेशियात ११ डिसेंबरपर्यंत राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. बिरेयूएन जिल्ह्यात दोन पूल वाहून गेले आहेत. त्यामुळे उत्तर सुमात्रामधील मेदन शहराशी असलेला संपर्क तुटला आहे. त्यामुळे स्थानिक रहिवाशांना नाईलाजाने पूर आलेल्या नदीमधून बोटींनी प्रवास करावा लागतो आहे. भूकंप प्रवण क्षेत्र असल्यामुळे इंडोनेशियाला भूकंप, ज्वालामुखी आणि त्नामीचा सतत धोका असतो. अतिवृष्टीमुळे इंडोनेशियामध्ये विनाशकारी पूर नेहमीच येत असतात.