गुजरातमध्ये पावसाचा जोर ओसरला: काही भागांत पूरसदृश परिस्थिती कायम, बळींचा आकडा २९वर

अहमदाबाद – गुजरातमधील पावसाचा जोर गुरुवारी थोडा ओसरला असला तरी काही भागांत पूरसदृश स्थिती कायम आहे. वडोदरासह काही ठिकाणी नद्या ओसंडून वाहत असल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
पावसाशी संबंधित विविध घटनांमध्ये आजपर्यंत चार दिवसांत २९ जणांचा बळी गेला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. राज्यातील पूरग्रस्त भागातून 18,000 हून अधिक लोकांना स्थलांतरित करण्यात आले असून सुमारे 1,200 लोकांना वाचवण्यात आले आहे.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी फोनवरून संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला आहे. तसेच संकटकाळात राज्याला सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन देखील यावेळी पंतप्रधानांनी दिले आहे. तसेच प्रशासन, एनडीआरएफ, एसडीआरएफ, सेना, भारतीय हवाई दल आणि भारतीय तट रक्षक दलांच्या मदतीने गुजरातमध्ये बचाव कार्य देखील सुरू आहे.





