Pune Rain : सोमवारपासून पुणे शहरात पावसाची संततधार सुरू आहे. पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळित झालं आहे. तसेच पावसामुळे शहरातील रस्त्यांवर पाणी साचल्याने या पाण्यातून मोठी कसरत करत वाहनधारकांना वाट काढावी लागत आहे. अशातच आता पावसाचा विमान सेवेलाही फटका बसला आहे. खराब हवामानामुळे दिल्लीहून पुण्याला येणाऱ्या विमानाला हैदराबाद विमानतळावर उतरावे लागले. तसेच पुण्याहून विमानांचे उड्डाण तीन तास उशीर झालं आहे. पावसाचा पुण्यातील वाहतूक व्यवस्थेलाही फटका बसला आहे. वाहतूक सेवेलाही फटका पुण्यासह राज्यभरात पावसाने हाहाकार केला आहे. अनेक ठिकाणचे रस्ते जलमय झाले आहेत. मुंबईत पावसाची जोरदार बँटिग सुरू आहे. पावसामुळे मुंबईहून पुण्याला येणाऱ्या एसटीच्या शिवनेरी बससेवा देखील विस्कळित झाली. सुमारे एक तास उशिराने बस स्वारगेट स्थानकात आली. पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरील वाहतूक देखील धीम्या गतीने सुरू आहे. या विमानांना फटका दिल्लीहून पुण्याला येणारे इंडिगोचे विमान (६ इ -५३८७) हे दुपारी १ वाजून २० मिनिटांनी पुणे विमानतळावर दाखल होणे अपेक्षित होते. मात्र खराब हवामानामुळे हैदराबाद विमानतळावर उतरले. पुण्याहून दिल्लीला जाणारे इंडिगोचे विमान (६ इ -२२८५) हे विमान दुपारी २ वाजून ५ मिनिटाने दिल्लीसाठी उड्डाण करणार होते. प्रत्यक्षात मात्र ४ वाजून ३५ मिनिटांनी उड्डाण केले. पुणे – जळगाव (आयसी – ५६०६) हे विमान दुपारी ३ वाजून ५५ मिनिटांनी उड्डाण करणार होते. प्रत्यक्षात मात्र सायंकाळी ५ वाजून ४० मिनिटांनी उड्डाण केले. पुणे – जयपूर (एसजी – १०८०) हे विमान पुण्याहून ५ वाजून ३० मिनिटांनी उड्डाण करणार होते. प्रत्यक्षात मात्र ९ वाजून १० मिनिटांनी उड्डाण झाले. हेही वाचा : विरोधी पक्ष आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार जाहीर करणार? ; ‘या’ ३ नावांच्या चर्चांना उधाण