Pimpari : मावळात पावसाचा कहर! रस्ते पाण्याखाली, वीज पुरवठा खंडित, जनजीवन विस्कळीत

पवनानगर: मावळ तालुक्यासह संपूर्ण पुणे जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसत आहे. गेली दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार सरींनी तालुक्यातील नदी, नाले, ओढ्यांना पूर आला असून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. पवन मावळ परिसरात तर पावसाचा कहर पाहायला मिळत आहे.
दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह सुरू असलेल्या पावसामुळे शिवली – येवलेवाडी हा रस्ता पाण्याखाली गेला. सोबत सोमाटणे-पवनानगर रस्त्यावरील बेबडओहळ इथे मोठे झाड पडल्यामुळे येथील वाहतूक विस्कळीत झाली होती. यासह याच परिसरात अनेक ठिकाणी विद्युत पोल वाकल्याने आणि विजेच्या तारा तुटल्याने काही भागांचा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.
अतिपावसामुळे शेतांचे नुकसान
अतिमुसळधार पावसामुळे ओढे, ओहोळ दुथडी भरून वाहताहेत. सोबत भातखाचरे देखील तुडूंब भरली आहेत. अशावेळी काही शेतांचे बांध फुटून शेत खाचराचे नुकसानीच्या घटना घडत आहेत.
मळवंडी ठुले धरण शंभर टक्के भरले
सततच्या पावसामुळे पवन मावळ विभागातील मळवंडी ठुले हे धरण १०० टक्के भरले असल्याची माहिती कार्यकारी अभियंता, खडकवासला पाटबंधारे विभाग यांच्याकडून देण्यात आली. गुरुवारी (दि. १९) सकाळीच हे धरण शंभर टक्के भरले असून धरणात ३.६९ द.ल.घ.मी पाणीसाठा आहे. सदर तलाव द्वारविरहित म्हणजे गेट नसलेला आहे. त्यामुळे धरण भरल्याने कोथूर्णे ओढ्याद्वारे पवना नदीमध्ये अनियंत्रित विसर्ग सुरु झालेला आहे. यामुळे वारू, कोथूर्णे, ब्राह्मणोली, काले गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पवनानगर : झाड रस्त्यात कोसळल्याने पवनानगर-सोमाटणे दरम्यानची वाहतूक विस्कळीत झाली.
पवन मावळ : मुसळधार पावसाने शिवली-येवलेवाडी रस्ता पाण्याखाली गेल्याने ग्रामस्थांचा संपर्क तुटला.





