पुणे | कोथरूड, वडगावशेरी भागांत वादळी वाऱ्यासह पाऊस

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – लोकशाहीच्या उत्सवाला पावसानेही साथ दिली असून, सोमवारी (दि. 13) दिवसभर हवामान कोरडे राहिले, तर सायंकाळी सहानंतर कोथरूड, वडगावशेरीसह काही भागांत वादळी वाऱ्यासह पावसाला सुरवात झाली. त्यामुळे मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात पावसाने मतदारांची धांदल उडवली. त्यामुळे काही मतदान केंद्रांवर उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती.
दि. 13 मे रोजी चौथ्या टप्प्यासाठी होणाऱ्या मतदानावर अवकाळी पावसाचे सावट होते. पुणे शहरासह जिल्ह्याला हवामानशास्त्र विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. त्यामुळे पाऊस येण्याआधीच मतदान करून घेऊ, या विचाराने मतदारांनी सकाळी सात वाजल्यापासून मतदान केंद्रांवर गर्दी केली होती. त्यामुळे दुपारपर्यंत मतदानाचा टक्का चांगलाच वाढला होता.
मात्र, पाऊस पडण्याऐवजी उन्हाचा चटका वाढल्यामुळे मतदानासाठी बाहेर पडणाऱ्यांचा प्रतिसाद कमी झाला. त्यामुळे काही मतदान केंद्रांवर शुकशुकाट, तर काही ठिकाणी वर्दळ कमी होती. मात्र, कोथरूड आणि कसबा मतदारसंघांतील काही केंद्रांवर मतदारांची वर्दळ कायम असल्याचे दिसून आले.
दरम्यान, मतदानाची वेळ संपत आल्यावर अवकाळी पावसाने विजांच्या कडकडाटांसह शहरासह उपनगर भागांत वादळी वाऱ्यासह पावसाला सुरवात झाली. मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघांतही दुपारी पाच वाजताच पावसाने हजेरी लावल्यामुळे शेवटच्या टप्प्यात मतदारांची धांदल उडाली. या वेळी कोथरूड, कात्रज, धनकवडी, वडगावशेरी, कोरेगाव पार्क, मगरपट्टा, हडपसर यासह शहराच्या मध्यवर्ती मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळल्या.
मतदानासाठी गेले न् दोन तासांनी बाहेर पडले…
पावसाचे सावट दिसत नाही, त्यामुळे ऊन खाली झाल्यावर मतदानासाठी जाऊ, असा विचार करून चारनंतर घराबाहेर पडलेले मतदार मतदान केंद्रावर पोहोचले. मात्र, मतदान केंद्रावर गर्दी झाल्यामुळे मतदानासाठी तासभर वेळ जात होता. त्यानंतर बाहेर आले तर पाऊस सुरू. त्यामुळे त्यांना आहे त्याच ठिकाणी आडोशाला ताटकळत उभे राहावे लागले. या वेळी काही मतदार भरपावसात मतदानासाठी येत असल्याचेही दिसून आले.
शहरासह जिल्ह्यात सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत झालेला पाऊस (मिमीमध्ये)
गिरीवन – 10, निमगिरी – 7, बालेवाडी – 5, कोरेगाव पार्क – 2, खेड – 1, कोथरूड – 1





