Rain Update: दिवाळीत धामधुमीत वरुणराजाची एन्ट्री; बारामतीला मुसळधार पावसाने झोडपले!
Baramati: महिनाभराच्या पावसाची कसर एका रात्रीत भरून निघाली; बळीराजा सुखावला

बारामती: गेल्या अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बारामतीकरांवर वरुणराजाने दिवाळीच्या काळात दमदार हजेरी लावली आहे. पहाटेपासून (ता. २) सुरू झालेल्या मुसळधार पावसाने अवघ्या काही तासांत शहराला झोडपून काढले. सकाळी सात वाजेपर्यंत तब्बल १५८ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी दिली.
दरम्यान, महिनाभराची पावसाची तूट एका रात्रीत भरून काढणाऱ्या या पावसामुळे नागरिकांसह बळीराजा सुखावला आहे. पहाटेपासून सुरू झालेल्या पावसाने काही वेळातच रौद्र रूप धारण केले. अडीच ते तीन तास पावसाचा जोर इतका प्रचंड होता की, शहरातील सखल भागांत पाण्याची तळ साचले आहे. सकाळी साडेआठ वाजेपर्यंत पावसाचा जोर कायम असल्याने दैनंदिन व्यवहार, वाहतूकीवर परिणाम झाला.
पाणीटंचाईची चिंता नागरिक व्यक्त करीत असतानाच झालेल्या या दमदार पावसाने मोठा दिलासा दिला आहे. दिवाळीच्या काळात बरसलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असून, बळीराजासाठी हा पाऊस दिलासादायक ठरण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
मात्र, पावसामुळे सखल भागांत निर्माण झालेल्या जलसाठ्याने शहरातील पावसाळी नियोजन आणि पाण्याचा निचरा यांचा प्रश्नही पुन्हा ऐरणीवर आला आहे.





