देशभरात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज

नवी दिल्ली/मुंबई – देशभरात काही दिवसांपासून मंदावलेल्या पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. १२ ऑगस्टला कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊ शकतो, १३ ऑगस्टला हे क्षेत्र आणखी मजबूत होईल. सध्याची हवामानस्थिती या कमी दाबाच्या पट्ट्याला अनुकूल आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात देशभरात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे, असे हवामान खात्याने म्हटले आहे.
पुढील आठवड्यात बंगालच्या उपसागरात निर्माण होणा-या कमी दाबाच्या पट्टयामुळे पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, आणि पूर्व उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, तर दुसरीकडे याचा परिणाम म्हणून छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा व गोवामध्ये देखील जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दरम्यान, काही दिवसांपासून देशातील अनेक भागांमध्ये मान्सूनची गती मंदावल्याचे पाहायला मिळत आहे. पावसाचा जोर ओसरला आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार भारताच्या उत्तर, पश्चिम, मध्य आणि काही ठिकाणी दक्षिण भागामध्ये मान्सून कमजोर झाला आहे. मात्र वातावरणाची ही सामान्य स्थिती आहे. त्यामुळे चिंता करण्याचे काही कारण नाही. मात्र ही स्थिती जर लांबली तर चिंता वाढू शकते, परंतु सध्या तरी तसे चित्र दिसत नाही आहे.





