खालापूर – धाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ताकई येथील बोंबल्या विठोबाच्या यात्रेवर सध्या अवकाळी पावसाचे सावट आले असून, यात्रेच्या तयारीवर पावसाने पाणी फेरले आहे. मुसळधार पावसामुळे दुकानांचे गाळे, आकाशपाळणे आणि मनोरंजनाच्या साधनांची उभारणी ठप्प झाली आहे. त्यामुळे यात्रेतील व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ताकई गावातील विठ्ठल मंदिराला धाकटी पंढरी अशी ओळख आहे. दरवर्षी कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर येथे पंधरा दिवसांची भव्य यात्रा भरते. या यात्रेदरम्यान कोकण आणि महाराष्ट्रातील हजारो भाविक येथे दाखल होतात. सुखी मासळी, भेळपुरी, जिलेबी, खेळणी, चायनीज पदार्थ, हॉटेल्स आदींच्या दुकानांमुळे कोटींच्या उलाढालीची ही यात्रा ओळखली जाते. मात्र, ऐन दिवाळी आणि पर्यटन हंगामाच्या तोंडावर झालेल्या पावसामुळे संपूर्ण परिसर चिखलमय झाला आहे. रस्ते चिखलाने भरले असून, यात्रेच्या तयारीत अडथळे येत आहेत. व्यापाऱ्यांनी दुकाने उभारण्याचे काम थांबवले आहे. तसेच आकाशपाळणे आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमांवरही अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे. स्थानिक व्यापाऱ्यांनी सांगितले की, पावसाचा जोर असाच राहिला तर यात्रेत मोठे नुकसान होईल. भाविकांची ये-जा कमी होईल आणि उलाढाल घटेल, अशी चिंता व्यापाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे. धाकटी पंढरी देवस्थान समिती आणि नगरपालिका प्रशासनाने व्यापाऱ्यांना धीर देत सांगितले की, नगरपालिका प्रशासन चोख व्यवस्था करेल. व्यापाऱ्यांनी घाबरून न जाता आपापली दुकाने सुरू करावीत. श्री विठोबा देवस्थान कमिटीही सर्व सहकार्य करेल. पंधरा दिवसांची यात्रा उत्साहात पार पडेल, असा विश्वास देवस्थान समितीच्या वतीने व्यक्त करण्यात आला.