52 ठिकाणी सोसायट्या, पार्किंगमध्ये पाणी शिरले पुणे – राज्याला पुन्हा एकदा मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. अनेक जिल्ह्यातील गावे आणि शेती पाण्याखाली गेली असून शहरांमध्येही रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते. दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि आसपासच्या दक्षिण कोकण प्रदेशात अद्यापही कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे. त्यामुळे पुढील 48 तासांत महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरात किनारपट्टीवर कमी दाबाच्या पट्टयाची तीव्रता वाढेल. हा पट्टा पश्चिम-वायव्येकडे सरकत जाऊन तीव्र स्वरूपाचा होईल त्यामुळे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. शहरात बुधवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे शहराच्या वेगवेगळ्या भागातील सोसायट्या, घरे व पार्किंगच्या ठिकाणी पाणी शिरण्याच्या तब्बल 52 पेक्षा जास्त घटना घडल्या. बहुतांश ठिकाणी अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ पोहोचून पाणी काढण्याचे काम गुरुवारी पहाटेपर्यंत सुरू ठेवले होते. याबरोबरच 13 ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या. शहरात बुधवारी सायंकाळी शहरात पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर रात्री पावसाचे प्रमाण वाढले. मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू झाल्याने रस्ते पाण्याने भरून वाहू लागले. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी आणि पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था नसल्याने पाणी सोसायटयाचे तळघर, घरे व पार्किंगमध्ये शिरले. त्यामध्ये गाड्या पाण्यात गेल्या. रात्री पाऊस वाढल्याने येरवडा, विश्रांतवाडी, लोहगाव या भागातील सोसायट्या, बैठी घरे व पार्किंगच्या ठिकाणी पाणी शिरण्याच्या जास्त घटना घडल्या. शास्त्रीनगर, पोरवाल रोड, चंदननगर, विश्रांतवाडी येथे पाणी शिरले. त्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात चिंतेत होते. दरम्यान, येरवडा, नायडू, हडपसर अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी जाऊन पाणी काढण्याचा प्रयत्न केला. चंदननगर पोलीस ठाण्यालाही पावसाच्या पाण्याचा फटका बसला. संपूर्ण पोलीस ठाण्यात पाणी शिरल्याने पोलिसांचाही गोंधळ उड़ाला. पोलिसांची वाहनेही पावसाच्या पाण्यात बुडाली. पुण्यात 130 मिमी पाऊस… पुण्यात शिवाजीनगर येथील वेधशाळेत गुरुवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये 112.1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. लोहगाव येथे सर्वाधिक 125.7 मिलीमीटर पाऊस पडला आणि पाषाण 120.2 मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला. शहरात पावसाची एकूण नोंद 130 मिलीमीटर झाली.