मुंबई – परतीच्या पावसाने राज्यात थैमान घातले आहे. मुंबई, पुणे, मराठवाडा, विदर्भासह राज्यातील अनेक भागात आज पावसाने जोरदार हजेरी लावली. अनेक तास चाललेल्या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले आहे. अनेक ठिकाणी लोकलच्या रुळावर पाणी साठण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे लोकल सेवा प्रभावित होऊ शकते. कामगारांना कामावर जाताना अडचणी येण्याची शक्यता आहे. संभाव्य परिस्थितीचा धोका लक्षात घेता मुंबई महापालिका सज्ज झाली आहे. हवामान विभागाकडून मुंबईत पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईत उद्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी माहिती दिली आहे. शिक्षण विभाग काही वेळातच याबाबतचा अधिकृत परिपत्रक जारी करणार असल्याची माहिती दीपक केसरकर यांनी दिली आहे. मुंबई महापालिकेकडून महत्त्वाचं आवाहन – “भारतीय हवामान खात्याने मुंबईत उद्या २६ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ८.३० पर्यंत अत्यंत जोरदार पावसाचा अंदाज (रेड अलर्ट) वर्तवला आहे. सबब, नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, ही विनंती. आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ मदतीसाठी १९१६ या क्रमांकावर संपर्क साधावा”, असं आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात आलं आहे. “भारतीय हवामान विभागाने मुंबई महानगराला उद्या (दिनांक २६ सप्टेंबर २०२४) सकाळी ८.३० पर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) दिला आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालयांना उद्या गुरूवार दिनांक २६ सप्टेंबर २०२४ रोजी सुटी जाहीर करण्यात येत आहे. आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे”, असे आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात आलं आहे.