पुणे – राज्यात पुढील तीन दिवस कोकण-गोव्यासह विदर्भातील काही भागांत मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मागील आठ ते दहा दिवसांपासून राज्यातील कमी झालेला पावसाचा जोर पुन्हा वाढू लागला आहे. गेल्या 24 तासांत कोकण-गोवा, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात तर मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. दरम्यान, घाटमाथ्यावरही पावसाला जोर वाढू लागला आहे. त्यामुळे लोणावळा, ताम्हिणी, शिरगांव, डुंगरवाडी धारावी, कोयना या घाटमाथ्यावर चांगला पाऊस झाला. दरम्यान, पुढील तीन दिवसांसाठी पुणे, मुंबई, नागपूरसह कोकण गोव्यातील बहुतांश भागात यलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकण किनारपट्टीवर सोसाट्याचा वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मासेमारी करणाऱ्यांनी सतर्क रहावे. पर्यटकांनी समुद्रकिनारी जावू नये. तसेच घाटमाथ्यावरही पर्यटकांनी जाणे टाळावे, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. गेल्या 24 तासात घाटमाथ्यावरील पाऊस (मिमीमध्ये) लोणावळा 41, वळवण 31, अंबवने 39, धावडी 36, डुंगरवाडी 71, कोयना 30, खोपोली 40, ताम्हिणी 56, भिरा 59, धारावी 61