पुणे | शहरात पावसाचा पुन्हा हाहाकार; पुरस्थितीने पुणेकरांचे जनजीवन विस्कळीत

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुणे, पिंपरी चिंचवड शहरांसह उपनगरांत रविवारी पहाटेपासून जोरदार पाऊस झाला. यात मुळा, मुठा या नद्यांना पूर आल्याने वस्ती भागांसह सोसायटी आणि दुकानांमध्ये पाणी शिरले. दिवसभर धो-धो पावसामुळे जनजीवन पुरते विस्कळीत झाले. दिवसभरात वडगावशेरी येथे सर्वाधिक ४३, तर शिवाजीनगर परिसरात ४० मिमी पावसाची नोंद झाली.
घाट परिसरात अति जोरदार पावसामुळे रस्ते खचले, दरडी कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली. दावडी घाट परिसरात सर्वाधिक २४६ मिमी, तर ताम्हिणी घाटामाथ्यावर २४० मिमी पावसाची नोंद झाली.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरण साखळीत जोरदार पाऊस पडत असल्याने खडकवासला धरणातून सायंकाळी सात वाजता ४५ हजार ७०५ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता. पावसाचा जोर वाढला तर विसर्ग वाढविणार असल्याने धोक्याची पातळी ओलांडण्याची भीती आहे.
हवामानशास्त्र विभागाकडून दि. ३ आणि ४ आॅगस्ट रोजी पुणे शहर आणि जिल्ह्यात आॅरेंज तर घाट परिसरात पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला होता. ३ आॅगस्टला पावसाचा जोर कमी होता.
मात्र, मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला आणि धो-धो पावसाने नदीलला पूर आला आणि नागरिकांना पुन्हा स्थलांरीत करण्याची वेळ आली. आज सकाळपासून पावसाचा जोर कायम होता. जोरदार सरींमुळे रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले. रविवार सुट्टी असल्याने आणि हवामान विभागाने रेड अलर्ट दिल्यामुळे नागरिक घरीच थांबल्यामुळे सकाळी कोंडी टळली.
पाणी पाहण्यासाठी पुलावर नागरिकांची गर्दी
शहराच्या धरणसाखळीतील चारही धरणे भरली आहेत. तर गेल्या २४ तासांत जोरदार पावसामुळे या चारही धरणांतून विसर्ग सुरू असल्यामुळे खडकवासला धरणातून सकाळपासून टप्यटप्याने विसर्ग वाढविण्यात येत आहे. सायंकाळी सात वाजता धरणातून ४५ हजार क्युसेकने विसर्ग सुरू होता.
त्यामुळे नदीला पुर आला होता. त्यामुळे पुर पाहण्यासाठी झेड ब्रिज, छत्रपती शिवाजी महाराज पूल, लकडी पूल, एस.एम.जोशी पुलावर नागरिकांची गर्दी झाली होती. दुपारी पावसाने उघडीप दिल्यावर ही गर्दी आणखी वाढली. यावेळी पोलिसांनी गर्दी कमी केली.
ठळक मुद्दे
– खडकवासला धरणातून ४५ हजार क्युसेकने विसर्ग सुरू
– ३५९ जणांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर
– वारजे, सिंहगड रस्ता, येरवडा, पाटील इस्टेट, ढोले पाटील रोड परिसरात पाणी घुसले
– बाबा भिडे पुल, नांदेड सिटी पुल आणि टिळक पुल पाण्याखाली
– घाट परिसरात मुसळधार पावसाने रस्ते खचले, दरडी कोसळल्या
– पावसामुळे सार्वजनिक वाहतुक कोलमडली; एसटी, रेल्वे सेवेवर परिणाम
पुण्यात पावसाचा रुद्रावतार
– धो-धो पावसामुळे जनजीवन पुरते विस्कळीत
– वस्ती भागांसह सोसायटी, दुकानांमध्ये पाणी
– घाट परिसरात रस्ते खचले, दरडी कोसळल्या
– खडकवासला धरणातून उच्चांकी विसर्ग
– मुळा, मुठा नद्या तुडूंब, नागरिकांची गर्दी
शहरासह जिल्ह्यात सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंतचा पाऊस
लोणावळा – ८०, माळीण – ४५, वडगावशेरी – ४३, शिवाजीनगर – ४०, चिंचवड – ३९, पाषाण – ३८, तळेगाव – ३०, दापोडी – २९, नारायणगाव – २०, राजगुरूनगर – १९, आंबेगाव – १६, हडपसर – १५, हवेली – १३, एनडीए – ९, दौंड – ५ मिमी पावसाची नोंद झाली.





