Railway Overbridge : येवेलाकरांची कोंडी फुटणार! ‘या’ दोन रेल्वे फाटकांवर उभारले जाणार उड्डाणपूल
Railway Overbridge : रेल्वे मालगाड्या आणि एक्स्प्रेसमुळे होणारी वाहतूक कोंडी थांबवण्यासाठी 'अंडर ब्रिज'ऐवजी आता 'ओव्हर ब्रिज' उभारण्यावर शिक्कामोर्तब.

Railway Overbridge – येवला तालुक्यातील नागरिक, शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी तसेच शिर्डीकडे जाणाऱ्या साईभक्तांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या येवला- नांदगाव रस्ता (रामा २५) वरील गेट क्रमांक ७७ (साखळी क्र. ७७/८००) तसेच येवला- भारम रस्ता (रामा ४१२) वरील गेट क्रमांक ७६ (साखळी क्र. १/१) येथे प्रस्तावित रेल्वे उड्डाणपूल (ROB) उभारणीस लवकरच प्रारंभ होईल, असे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्पष्ट केले.
येवला येथे रेल्वे उड्डाणपूल उभारणीसंदर्भात मंत्रालयात मंत्री छगन भुजबळ यांच्या दालनात महत्त्वपूर्ण बैठक झाली. यावेळी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी संबंधित कामांचा सविस्तर आढावा घेतला. या बैठकीत संबंधित प्रकल्पाच्या विविध तांत्रिक व प्रशासकीय बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
येवला-नांदगाव हा महत्त्वाचा राज्य मार्ग असून नाशिक, नांदगाव तसेच जळगाव जिल्ह्याच्या वाहतुकीसाठी हा प्रमुख दुवा आहे. येवला येथील प्रसिद्ध पैठणी उद्योग, कृषी उत्पन्न बाजार समिती बाजार, कांदा व इतर शेतमाल वाहतूक तसेच शिर्डीकडे जाणाऱ्या भाविकांसाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे.
या रेल्वेमार्गावर दररोज १०० हून अधिक एक्सप्रेस आणि मालगाड्यांची वाहतूक होत असल्याने रेल्वे फाटक वारंवार बंद राहते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होऊन नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. पावसाळ्यात RUB (रेल्वे अंडर ब्रिज) पर्यायामुळे पाणी साचण्याची शक्यता लक्षात घेऊन या ठिकाणी ROB उभारण्याचा प्रस्ताव पुढे नेण्यात येत असून, या कामांना लवकरात लवकर प्रशासकीय मान्यता मिळावी यासाठी बैठकीत चर्चा करण्यात आली.
यावेळी विधान परिषद आमदार पंकज भुजबळ, इंडियन रेल्वे सर्व्हिस ऑफ इंजिनिअर्स (IRSE) चे विनोद मधुकर भांगळे, उपमहाव्यवस्थापक निलेश यार्हेकर, सचिव (रस्ते) शरद राजभोज, PWD उपविभागीय अभियंता सुमेरसिंग पाकल, PWD कार्यकारी अभियंता मुकेश ठाकूर तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.





