राजकीय जाहिराती हटविण्याचे रेल्वेचे आदेश

नवी दिल्ली – रेल्वे मंडळाचे अध्यक्ष व्ही. के. यादव यांनी रेल्वेच्या आवारातून व रेल्वेशी संबंधित सर्व प्रकारच्या साहित्यांतून सर्व प्रकारच्या राजकीय जाहिराती तत्काळ हटविण्याचे आदेश दिले. रेल्वेगाड्यांमध्ये चहासाठी दिल्या जाणाऱ्या कागदी ग्लासवर भाजपची मैं भी चौकीदार ही निवडणूक घोषणा छापण्यावरून मोठा वाद झाला होता. तसेच रेल्वे तिकिटांच्या मागील बाजूस छापलेली पंतप्रधान मोदी यांची छायाचित्रे आचारसंहिता लागू झाल्यानंतरही कायम असण्यावरून रेल्वे प्रशासनास निवडणूक आयोगाने धारेवर धरले होते.

या पार्श्वभूमीवर यादव यांनी सर्व विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना कळविले की, रेल्वेची तिकिटे, अन्य प्रकारची स्टेशनरी अथवा रेल्वेच्या आवारात अन्य कुठेही कोणत्याही राजकीय नेत्याचे छायाचित्र असलेल्या जाहिराती असतील त्या तत्काळ हटविल्या जाव्यात. जाहिरात एजन्सीलाही त्यासंबंधी योग्य त्या सूचना द्याव्या. आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल रेल्वेकडे खुलासा मागविण्यात आला आहे. तसेच याला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांची नावेही रेल्वेकडे मागितली आहेत, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले होते.

सेवा व आरक्षणाचे काम पाहणाऱ्या आयआरसीटीसीने एका निवेदनात म्हटले होते की, मैं भी चौकीदार अशी घोषणा छापलेल्या पेल्यातून रेल्वेमध्ये ग्राहकाला चहा दिला जात असल्याबद्दल चौकशी केली गेली. आयआरसीटीसीची पूर्वानुमती न घेता असे केले जात होते. कामात कसूर केल्याबद्दल पर्यवेक्षक व पॅन्ट्री प्रमुखांकडून खुलासा मागविण्यात आला असून सेवा पुरवठादार एजन्सीला एक लाख रुपये दंड करण्यात आला आहे. याबद्दल कंत्राट रद्द का करू नये अशी कारणे दाखवा नोटीसही एजन्सीला बजावण्यात आली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.