प्रभात वृत्तसेवा पुणे – हडपसर-मांजरी रेल्वे स्थानक परिसरात दोन अल्पवयीन मुलांसह तिघांचा रेल्वेच्या धडकेने जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री साडेआठला घडली. मृत्यू पावलेले तिघेजण रुळांच्या परिसरात शतपावलीसाठी फिरत होते. प्रथमेश नितीन तिंडे (१८, रा. काळेपडळ, हडपसर), तन्मय महेंद्र तुपे (१७, रा. विशाल कॉलनी, ढेरे बंगला, गोपाळपट्टी) आणि तुषार शिंदे (१७, रा. गोपाळपट्टी, हडपसर) अशी मृतांची नावे आहेत. त्यांच्या सोबतचे तीन मित्र मात्र बचावले. पोलिसांच्या माहितीनुसार, पुणे–दौंड डेमू रात्री साडेआठच्या सुमारास पुण्याहून दौंडकडे निघाली होती. याचवेळी हे सहाजण रेल्वे रुळाजवळून चालले असताना त्यातील तिघांना रेल्वेची धडक बसली. बाकीचे तिघेजण अपघातानंतर पळून गेले होते. त्यांनीच ही माहिती मृतांच्या नातेवाईकांना दिली. हडपसर व लोहमार्ग पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ससूनला पाठविले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले म्हणाले की, रुळाच्या दोन्ही बाजूला वस्ती आहे. हे तरुण नेहमी रात्री जेवणानंतर रेल्वे रुळालगत चालत असतात. रविवारी ते एका वस्तीतून दुसऱ्या वस्तीत जात होते. तिघेजण रुळ ओलांडून पलीकडे गेले. मात्र मागे राहिलेल्या तिघांना रेल्वेजवळ आल्याचा अंदाज आला नाही. ते त्याखाली सापडून जागीच ठार झाले. वस्तीवर शोककळा मृत तिघेही मित्र असून छोटी-मोठी कामे करुन उदरनिर्वाह करत होते. एकाच वस्तीत रहात असल्याने वस्तीवर शोककळा पसरली होती. नवले पुलाजवळ अपघातात नुकताच आठजणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पुन्हा एकदा पुणे हादरले आहे.