रायगड : महाराष्ट्रात पुढील काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची (Raigad Politics) शक्यता आहे. यासाठी सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुती म्हणूनच या निवडणुका लढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. काही ठिकाणी अपवादात्मक मैत्रीपूर्ण लढती होऊ शकतात. परंतु महायुती हाच प्राधान्याचा पर्याय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावात बोलताना महायुतीतील अंतर्गत मतभेद उघड केले. ते म्हणाले, “भाजप एकीकडे युतीची भाषा करते, तर दुसरीकडे स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी करते.” याचबरोबर, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते प्रफुल्ल पटेल यांनीही अलीकडेच स्वबळाचे संकेत दिले आहेत. त्यामुळे महायुती एकजुटीने निवडणूक लढवेल की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, रायगड जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाने राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादीचे माजी जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य दया पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. रायगड हा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा बालेकिल्ला मानला जातो. अशा परिस्थितीत या पक्षप्रवेशाने शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा तटकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांच्या ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.