रायगड – रोहा पंचायत समितीच्या सहाय्यक गटविकास अधिकाऱ्यास दहा हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे. पंडित कौरू राठोड असे अटक केलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. विभागीय चौकशीमध्ये तक्रारदाराच्या बाजूने अहवाल पाठविण्यासाठी त्याने पंधरा हजाराची लाच मागितली होती. त्यापैकी 10 हजार रुपये स्विकारताना त्याला अटक करण्यात आली.
पंडित राठोड हे रोहा पंचायत समिती कार्यालयात सहाय्यक गट विकास अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्याकडे तळ्याचा अतिरिक्त कार्यभार होता. तक्रारदार यांच्या विरोधात कोकण भवन येथे एका प्रकरणाबाबत विभागीय चौकशी सुरू आहे. तक्रारदार यांच्या प्रकरणात आरोपी पंडित हे चौकशी अहवाल सादर अधिकारी म्हणून नेमलेले होते. तक्रारदार याच्या प्रकरणातील अहवाल आरोपी यांना तयार करून कोकण भवन येथे पाठवायचा होता. आरोपी पंडित यांनी तक्रारदार याच्या बाजूने अहवाल पाठविण्यासाठी 15 हजाराची लाच तक्रारदार याच्याकडे मागितली होती. त्यानुसार 28 फेब्रुवारी 2022 रोजी तक्रारदार यांनी पाच हजार पंडित यांना दिले होते.
तक्रारदार यांनी याबाबत अलिबाग येथे 24 मार्च रोजी लाचलुचपत कार्यालयात येऊन पंडित यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार आज 25 मार्च रोजी लाचलुचपत पथकाने रोहा पंचायत समिती कार्यालयात सापळा रचला आणि उर्वरित रक्कम दहा हजार रुपये स्विकारताना पंडित राठोड याला अटक करण्यात आली. ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपविभागीय अधिकारी सुषमा सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, कौस्तुभ मगर, स्वप्नाली पाटील, जितू पाटील यांनी केली.