नगर | शहरातील तीन कॅफेवर छापे

नगर, (प्रतिनिधी) – कॉलेजच्या तरूण-तरूणींना अश्लिल चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणार्या तोफखाना पोलीस ठाणे हद्दीतील तीन कॅफेवर नगर शहर पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांच्या पथकाने छापेमारी केली. तीन वेगवेगळ्या फिर्यादीवरून चौघांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शनिवारी (दि. १७) सायंकाळी सदरची कारवाई करण्यात आली.
सावेडी गावातील पंम्पींग स्टेशन रस्त्यावरील आर्गनो कॅफेवर पथकाने छापा टाकला असता तरूण-तरूणी अश्लिल चाळे करताना मिळून आले. त्यांना तोंडी समज देऊन सोडण्यात आले. कॅफेचा मालक अविनाश विलास ताठे (रा. पंम्पींग स्टेशन रस्ता, सावेडी) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पथकाने बालिकाश्रम रस्त्यावरील गंधे मळ्यातील गोल्डन कॅफेवर छापा टाकला असता तेथे तरूण-तरूणी अश्लिल चाळे करताना मिळून आले. त्यांना तोंडी समज देऊन सोडण्यात आले.
कॅफेचा मालक सार्थक अनिल गंधे (रा. गंधे मळा, बालिकाश्रम रस्ता) व कामगार शिबान मुअंदे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पाइपलाइन रस्त्यावरील श्रीराम चौकातील लव्हबर्ड कॅफेवर पथकाने छापा टाकला असता कॉलेज तरूण- तरूणी अश्लिल चाळे करताना मिळून आले. त्यांना तोंडी समज देऊन सोडण्यात आले असून कॅफे चालक ऋषीकेश सखाराम निर्मळ (रा. झोपडी कॅन्टींग, सावेडी) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपअधीक्षक भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार सुयोग सुपेकर, संतोष ओव्हाळ, गणेश चव्हाण, सचिन जाधव, हेमंत खंडागळे, सचिन मिरपगार, सागर व्दारके यांच्या पथकाने ही कारवाई केली.



